परवा अचानक मैत्रीण रेखा आणि भाची प्रीती बरोबर मराठी नाटक, “चारचौघी” बघायचा योग आला. अप्रतिम अशा कालातीत विषयाची मांडणी आहे नाटकाची. 91 मध्ये प्रसारित झालेले आणि पुन्हा नव्याने आलेलं नाटक आजच्या घडीला तितकंच चपखल बसतंय. प्रशांत दळवी लिखित नाटकाचे नाव “चारचौघी” असलं तरी महिलांबरोबर सर्व पुरुषवर्गाने आवर्जून बघावे असेचं नाटक आहे. किंबहुना वेगवेगळ्या वयोगटातील मुले, मुली, प्रौढ आणि वयस्कर सर्वांनीच वेळ काढून, आवर्जून पाहण्यासारखं नाटक आहे. नाटक फक्त पाहून संपत नाही. वेगवेगळ्या अँगलने विचार चालूच राहतात. विचारांची आवर्तन चालूच रहतात आणि व्यक्त होण्याला प्रवृत्त करतात. नव्याने काळाच्या पुढे जाऊन विचार करायला लावणारे नाटक आहे हे.
मी आता एवढ्या प्राथितयश कलाकारांना एकेरी नावानं संबोधलं तर वाईट वाटून घेऊ नये करण प्रत्येकीने जीवंत केलेली पात्रं जवळची वाटतात. ते अभिनय नाही करत, प्रत्यक्ष भूमिका जगतात. रोहिणी आणि मुक्ताचा जोडीदार हे संवादातून व्यक्त केलेली पात्रे प्रत्यक्ष स्टेजवर न येताच आपल्याला भेटावण्याचे सामर्थ्य शब्दात व्यक्त केलंय. “रोहिणी” मुख्य पात्र की, “मुक्ता”चं मुक्त होणं महत्वाचं की, कादंबरीचं धुमसून व्यक्त होणं आणि परिस्थिती स्वीकारणं की पर्णचे विचार गोंधळात टाकणारे आहेत की विचार करायला प्रवृत्त करणारे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.
फक्त स्त्री प्रधान नाटकाचा शिक्का मारणं चुकीचं आहे. एक पुरुष लेखक स्त्रीच्या अंतर्मनात शिरून इतक्या सुंदर तिच्या वेगवेगळ्या भावना अचूक शब्दात मांडू शकतो हे खरंच लेखकाप्रति आपले दोन्ही हात एकत्र येऊन अपोआप 🙏 नमस्कारासाठी जोडले जातात. इथेच नाटकंच यश प्रतीत होते. 90% स्त्रियांनी आणि हार्डली 10% पुरुषांनी नाटक पाहणे हे चव घेण्याअगोदरच पूर्वग्रह दूषित मनाने समोरचा मेहनतीने, प्रेमाने केलेला सुंदर, चविष्ट पदार्थ नावे ठेवून नाकारण्याचा कपाळकरंटेपणाचं म्हणावा लागेल.
अर्थात समाजात स्त्री आणि पुरुष या दोन जाती समाजाने नाही तर निसर्गाने बनवल्यात ते नैसर्गिक बदल एकमेकाला पूरक असणारेच आहेत. तिथे नसतो इगो तिथं नसते अरेरावी, मोठा – छोटा, कमी – जास्त, माझं – तुझं, वर – खाली, माहेर – सासर इत्यादी. या सगळ्या पलीकडे जाऊन निर्मळ मनाने, चवीने नाटक पाहावं. मुक्तपणे दाद द्यावी. नाटकातलं रोहिणी नक्षत्र क्रमाने चौथे आहे का❓️साहित्याचा प्रकार कादंबरी की, दीर्घकथा यांचा विचार न करता अनुभवाचे फुल पर्णसोबत छानच दिसते असे म्हणून मुक्त मनाने नाट्यगृहातून हळुवार बाहेर यावे कारण आपल्या निघण्यानंतर दुसरे रसीक नाट्यानुभव घेणासाठी तिसऱ्या घंटी अगोदर फोन स्विच ऑफ करून स्थानापन्न होतील आणि, “स्त्री हीच स्त्रीच्या दुःखाला कारणीभूत आहे” का ❓️या पर्णच्या वादविवाद स्पर्धेबाबत विचारमंथन सुरु करतील.
“नाट्य मंदिरात जा आणि नाटक पहा.” थेटर बाहेर आल्यानंतर मलाईदार लस्सी किंवा उभ्याने खाल्लेली चटपटीत पाणीपुरी ही पार्थिव जिभेवरील चव; हृदय, मना, मेंदूला मिळालेल्या “चारचौघी” नाटकाच्या चवीची लज्जत वाढवेल.
धन्यवाद प्रिय प्रीती, रेखा. एका सुंदर “चारचौघी” नाटकाचा आपण “तीन तिघीं”नी आवर्जून घेतलेल्या चवदार अनुभवाबद्दल.
wwwranjanarao.com
रंजना कुलकर्णी – राव 😊
पुढच्या वेळी समान धागा पकडून
आपल्या भेटीला येत आहे
खर्र खर्र सांग….
तो पर्यंत आपण दोन्ही नाटकातला समान धागा जो माझ्या खूप जवळचा आहे तो कोणता ❓️जरा guess करा.