“तू सदा जवळी रहा… ” भाग – 24

  भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  ……. भाग -2*  बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण….भाग-3*  शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई …, कुसुमताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….भाग -5*  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते:निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचं वैधव्य सदृश्य जीवन.  भाग -7 *  एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना ?   अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…भाग-  8*  आईचं  मानस  दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण आली. भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार? भाग – 10*  साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.भाग -11*  मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.भाग- 12* सुचिताची  प्रश्नावली, श्री आणि  विनिता,  घराचं घरपण कसं टिकवतात ? रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?  भाग -13* @रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली? @  चांद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते? भाग -14 *    काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी?   काका आजोबाचा  दिलासा,  सुट्टी कशी गेली ? विनिता रश्मीच्या सरना  का भेटली?  सर नी पेढे का मागितले?  भाग -15 *   वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न ??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली ? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत? भाग-16 *  विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीन?  दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? भाग- 17 @ दिवाळीचा म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई,  सर,  विनिता दरवाजा बंध का करतात?  केदार काका, रश्मी  कुठे  गेले?   काका, काकू रश्मी कुठे गेले? भाग – 18  तरुण मुलगी घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे 🙋‍♂️❓️प्रश्न,भाग -19,   आत्या की मैत्रीण,  फिरकी? अतरंगी 🙆‍♂️बंटी,  भाग 20,   कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा?  उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा? भाग -21,  विनिताच नेमकं काय आणि कोठे चुकलं?    श्याम दादाचं विनिताला अश्वासन..!  भाग – २२ * रश्मीच नवीन घर आणि वातवरण  कॉलेज प्रवास, पाऊस सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर😂😇 सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदांन, लायब्ररी…,😄 हास्य , आनंद म्हणजे … वहिनी, रोहन😛 आणि खेळ भाग – 24 * परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणी विचार, हृषि 💑❤ पद्मिनी, 1*श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2 आणि श्रध्दा असेल तरच

परीक्षा हॉल...

आता हॉल तिकीट मिळाले आणि नोट्स वरून शेवटची नजर फिरू लागली. वाटायचं अजुन वाचायचं खूप राहिलयं. काही वेळेस वाटायचं झालाय अभ्यास. परीक्षेच्या दिवशी आईला नमस्कार करून पॅड, पेन घेऊन बाहेर पडली रश्मी. दादा, वहिनी गॅलरीत उभे होते. “कॉलेज बसपर्यन्त दादा स्कुटर वरून सोडतील तुला.” वहिनी बोलल्या. दोघांनी  शुभेच्छा दिल्या. वहिनींनी शुभेच्छाबरोबर पेन  पण दिलं.    
सायकॉलॉजीच्या सरानी बरोबर सांगितलं होत आम्हाला, “अती टेन्शन घेणं  किंवा अजिबात टेन्शन नसणं, कदाचित तुम्हाला ध्येयाप्रत नेण्यासाठी मारक ठरू शकतं, म्हणून तणावाचा सकारात्मक उपयोग करणं आवश्यक आहे. मिडीयम टेन्शन असणं केव्हाही चागलं असतं. त्याचा योग्य विनियोग करणं हे तुमच्या हातात असतं.”  आणि सावंत सरांच्या या थेअरीचा आम्हाला खूप  उपयोगच  झाला. 
 “पूर्ण वर्ष असतं, तुमच्या जवळ अभ्यास करायला. फक्त तीन तास असतात समजलेलं उतर पत्रिकेत उतरवायला. पेपर देऊन एकदा हॉल मधून  बाहेर पडलात की तुमचं काम संपलं. नंतर अरेरे!! माझं हे उत्तर चुकलं, मी असं लिहायला पाहिजे होतं ! मी तसं करायला पाहिजे होतं ! नथिंग डूईंग,”  हे पवार सरानी सांगितलेलं वाक्य परीक्षा हॉलमधील तीन तसाचं महत्व अधोरेखित करणारं होतं. 
परीक्षा असते प्रत्येक कुटुंबाची,  शिक्षकाची आणि परीक्षार्थीची. कसोटीची वेळ. एकदा का कसोटीला उतरलं की, मग आपलं काम झालं. परीक्षा म्हणजे स्मरणशक्ती अजमावणं. परीक्षा मनात उतरते. रात्री झोपेत स्वप्नपण परीक्षेचीचं असत. कुठं तरी खोल सुप्त मनात दडून बसलेल्या या घटना  परीक्षा आणि त्या दरम्यान असलेला तणाव, घटना  आणि बरचं काही, कधीही डोकं वर काढतात.

परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना छातीची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. तळहात किंचित ओलसर जाणवत होते. उत्तरपत्रकेवर सीट नंबर लिहिताना, हातातून पेन निसटू नये म्हणून रुमालाने हात पुसला रश्मीने आणि वाट पहात राहिली, हातात प्रश्नपत्रिका येण्याची. फोल्डेड दोन पानी प्रश्नपत्रिका,  सरानी जेव्हा  बेंचवर ठेवली तेव्हा रश्मीने  दीर्घ श्वास घेतला.   प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर धरली तेंव्हा तिचा आत्मविश्वास दुणावला. नंतरचे तीन तास हॉलमध्ये पिनड्रॉप सायलेन्स होता. फक्त पेपरचे आवाज येत होते.  सर्व शिक्षक, आई,  बहिणी, किंबहुना असंख्य लोकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली होती. आणि आता जबाबदारी होती रश्मीची. अशा तऱ्हेने एक, दोन  म्हणता, म्हणता सहा  पेपर झाले आणि रश्मीची बारावीची  परीक्षा संपली.  मनात रिझल्टचं टेन्शन ठेऊन सर्व मुलं हॉलबाहेर पडली. 


सुट्टीतील  आनंद…

सुट्टीत आनंद आला आणि धमाल सुरु झाली. कधी राम मंदिरात दर्शन घेऊन  गार्डनमध्ये जात असू,  कधी दूर फिरायला रेणुकामातेच्या मंदिराजवळ,  कधी डोंगरावर असलेलं सुंदर जैन तीर्थंकर स्थान पाहायला,  कधी पत्ते खेळा,  कधी वाड्यातील सर्व जण मिळून काचा – कवड्याचा डाव खेळा, घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर लायब्ररी होती तिथं जा. आणि पिक्चर 😍 बापरे! धमाल नुसती ❗️ तोहफा  पिक्चरची तिकीटं काही मिळाली नाहीत, लाईनमध्ये उभं राहून सुद्धा. भाऊ आनंदनं ब्लॅकनं घेतली तिकीट आणि एवढ्या प्रचंड गर्दीत घुसून पिक्चर पहिला. आनंदला माहीत होतं श्रीदेवी,  जितेंद्र म्हणजे चंदाची आवडती जोडी.  मग काय बहिणीच्या आवडीपुढं बाकी कसला विचार नाही. तो  भेटल्या पासून त्यानं आमच्यासाठी आठवणीत राहतील अशा खूप गोष्टी केल्या.  त्याचं घरी येणं म्हणजे  आनंद सोहळा असे रश्मी, चंदा, सई आणि आई विनितासाठी.  
सुट्टीत काही नव्या गोष्टी शिकल्या,  खेळ,  गंमत आणि मजा मस्ती झाली. 
आणि बारावीचा निकाल लागल्यावर 
नेहमी सारखं विनितानं काका,   आत्या,   मावशी,  सोमण सर या  सर्वाना पत्रं  पाठवायला सांगितलं.   परत ऍडमिशन नवी पुस्तकं खरेदी…  ई.  घाई सुरु झाली.  आता चंदाची बारावी…  पण चंदा,  सईचं   शिक्षण व्यवस्थित चालू होतं. त्या विनिताला कधी टेन्शन देतं नसतं.  चंदाचा वर्ग म्हणजे विशेष होता. एका वर्गात सात कुलकर्णी होत्या आणि त्यांचे क्लास टीचर पण कुलकर्णी सरच  होते.


महान व्यक्ती आणि विचार…


शिक्षण घेण्यासाठी फॉरेनला गेलेले बाबासाहेब तिथं कसं रहात होते ? कसा अभ्यास करत होते ? हे वाचताना तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोर येतं होती. “मज जवळ खावयास अन्न नाही आणि झोपावयास वेळ नाही” म्हणणारे  बाबासाहेब इंग्लंडमध्ये लायब्ररी उघडायच्या अगोदर हजर असतं आणि बंद करताना सर्वात शेवटी  बाहेर पडायचे”.  माने सर शिकवताना प्रसंग उभा करत.  बाबासाहेबांची अभ्यासाची तळमळ आणि त्यासाठी करत असलेली मेहनत,  वेळेचं प्रचंढ  महत्व आणि तहान,  भूक हरवून झोकून देऊन करत असलेला अभ्यासाचा अट्टाहास, अभ्यासपूजा आम्हा सर्व मुलांना प्रेरणा देणारी होती. त्यांचं महानपण त्यांच्या “urge to  learn” मध्ये ओतप्रोत भरलेलं होतं. त्यांच्याबद्दल पूज्य भाव दाटून आला. लायब्ररीत बाबासाहेब आणि त्यांच्या अभ्यास कथा बाबत पुस्तकं धुंडाळायला मुलांची गर्दी झाली. आज माने सरांनी वर्गात काय शिकवलं हे लायब्ररीयन समजून चुकले. 
गोदावरी परुळेकर यांच्या बद्दल सांगताना भान हरवून बोलत होते सर. आदिवासी,  तिथलं कष्टमय  जीवन,  झोपडीत राहणं,  चुलीवर भाजलेली  कोंड्याची भाकर गरम करुन,  निर्जंतुकीकरण केल्याचं समाधान मिळवीणाऱ्या   गोदावरी ताई,   नुसतं  हाडं आणि त्वचा असणारी अशक्त मुलं आणि भाताची पेज पिऊन आणि कंद मुळं टाकून  उखळलेल गरम पाणी पिऊन राहणारी  आणि त्याही परिस्थितीत आदरातिथ्य करणारी आदिवासी कुटुंब.. …”तुम्हाला काय वाटलं?   गुरुवारच्या बाजारात कोंडा ठेवलेला असतो, तो  फक्त जनावर खातात?  अजूनही आपल्याकडे इतकी गरिबी आहे की, गरीब लोक हा जनावरांसाठी असलेला कोंडा विकत घेऊन खात आहेत.”  

अस्वस्थ… अस्वस्थ… अस्वस्थ… 


आणि मग दुपारचे दोन वाजले तरी नेहमी सारखी भूक नाही लागलीं….  
“काय झालं रश्मीssss…?  आज जेवत का नाहीस?  नुसती पोळी चिवडत राहिलीस?” रश्मीच्या न जेवण्यामुळं, विनिता हैराण झाली. तिला समजेना भरलं ताट समोर ठेऊन अशीच बसलीय ही. हिचे डोळे ओलसर का दिसताहेत?  गोड आवडत म्हणून  पोळीबरोबर श्रीखंड बनवलंय आज, तरी जेवत नाही?  “आई, मी नंतर जेवते.”,  म्हणून जेवणाच्या ताटाला नमस्कार करुन उठली आणि लायब्ररीतून आणलेलं गोदावरी  परुळेकरांचं पुस्तकं काढून वाचत बसली. 


“पोस्टमन” आवाज आला तसं  विनितानं दार उघडलं आणि पत्रं घेतलं. बाजूच्या वहिनीपण आल्या. “जेवलीस का रश्मी?” तारका वहिनी विचारत्या झाल्या “वहिनी जेवला नाहीत तुम्ही अजून?”   विनिताचा चेहरा पाहून तारा वहिनीनी आईला विचारलं. 
“म्हणजे,  तू न जेवता तशीच बसलीस आई आजून?”  रश्मीने आईला विचारलं. “कॉलेजमधून आल्यानंतर तुझं आणि चंदाचं जेवण झालं की, मगच वहिनी  जेवतात ना रोज ?   का,  काय झालं?”  वहिनींनी विचारलं.  रश्मीच्या हातातलं पुस्तकं पाहून त्या समजून चुकल्या…  “शेजारच्या वहिनींना माहित होतं, आपण जेवल्या शिवाय आई जेवत नाही ते.  आपण मात्र कधी लक्षच देत नाही आईकडे,” या विचारानं ओशाळवाणं वाटलं रश्मीला.  
रश्मीने अगोदर आईच पान वाढून घेतलं,  आणि तेवढ्यात चंदा पण आली आणि तिघी एकत्रच जेवल्या.  
विनिताला जेव्हा समजलं की,  रश्मीला जेवण का जात नाही, तेव्हा काळजी पोटी वाक्य बाहेर पडलं,  “असली, कसली पुस्तकं वाचतेस?  भूक मरून  जाते तुझी ?” पण त्यानंतर मात्र पुन्हा आईला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायचं ठरवलं रश्मीने


ऋषी ❤️ पद्मिनी….

सई नंतर, इतकं लहान घरी कुणीच नव्हतं. आणि लहानगा  रोहन  आम्हा सर्वांचा लाडका झाला. त्याच्या बाललिला निखळ आनंद देत असत. लाडोबा भारी हुशार, चाणाक्ष आणि हजर जबाबी  होता.  त्याची तर्कबुध्दी आणि निरीक्षण क्षमता यांचा प्रत्यय कुठेही दिसून येत असे. भवरेने 🦟🐝🦋🐝खीलाया फुल🌹🥀,🌺🌷🌸💮, फुल को ले गया राज कुवर …. म्हणत ऋषी – पद्मिनीचं गाणं सुरू होत टी. व्हि. वर. रोहन बाजूला  न्यूज पेपर फाडून बोटं करत होता. मध्येच म्हणायचा “मला पेपरची सुरळी करून दे”,आणि गन सारखं पकडून गोळ्या झाडल्याचा दुडुल, दुडुल, दुडुल आवाज करीत खेळत राहायचां. किंवा अमीर खानसारखं गिटार पकडून, “पापा केहेते हैं” ची ऍक्शन करत गाणं म्हणायचा. तो खेळ संपला होता. आता सई त्याला तिळगुळ बॉक्स बनवायला शिकवत होती.  गाणं संपताना पद्मिनी धावत सुटते आणि तिच्यापाठी ऋषी धावतो …. इथ चित्रहार संपतो …. 

“ताई मी तुला सांगू पुढं काय होणार❓️” साडे चार, पाचं वर्षाच्या रोहनने प्रश्न विचारला. “ती धावता, धावता, ठेच लागून पडणार आणि बेशुद्ध होणार आणि तो तिला मदत करणार आणि त्या दोघांचं प्रेम❤️❤️ होणार आणि लग्न करणार❗” प्रत्यक्षात त्याला टी. व्ही. पहायची मुळीच आवड नव्हती. त्याचा आपला खेळ चालू असे. पण  त्याच्या तर्कानं आम्ही अवाक झालो. ही इतकी लहान मूलं, त्यांना कसं काय एव्हड समजतं ⁉️ A for apple, B for ball म्हणायच्या वयात चकित करणारी तर्क शक्तीची प्रचिती नंतर येत राहिली. चंदा, सई बरोबर त्याची दोस्ती छान जमायची. विनिताकाकूंचा पांढरा रवा लाडू खूप आवडायचा म्हणून  आवर्जून आई  खायला द्यायची त्याला.


1. श्रद्धा असेल तर….. 

“विनिता sssss” ‘  
——————“विनिता ssssss,”——————-“विनी ssssss” मी जेवायला आलोय, खूप भूक लागलीय मला. जेवायला वाढ.” सोवळे नेसून,  दुरूनच श्री …  विनिताला हाक मारत होते.”

“हो, लगेच वाढते. तुम्ही हात, पाय धुवून या.” म्हणत अंथरुणातून उठून बसली विनिता. बाजूला सई झोपली होती आणि रात्रीचा एक वाजला होता. “अष्टमी…. उद्या… आहे, आई❗️ सकाळी निघू. छोटू काका डायरेक्ट, गुरुजींच्या घरी, वाडीलाच भेटणार आहेत. आता झोप, सकाळी लवकर उठून निघू.”  सई आईला बिलगली आणि आईच्या कुशीत शांत झोपी गेली. विनिता आडवी झाली अंथरुणात,  डोळे सताड  उघडे ठेऊन पडून राहिली. विनिताला तेरा वर्षापूर्वीची गोष्ट जशीच्या तशी आठवली. श्रद्धा असेल तर काय नाही होऊ शकत ?  प्रेमापाठीमागे श्रद्धा असेल तर त्याच्या उदात्त, उत्कट आणि दैवी रूपाची अनुभूती घेऊ शकतो आपण.   अभ्यासामागे श्रद्धा असेल तर भरारीला आकाश मर्यादा असते. मानवी मनात असलेल्या कोणत्याही  चांगल्या भावनेपाठी सश्रद्ध आणि निःस्वार्थ  भावनेनं केलेल कामं यशचं  देणार. लहान मुलासारखी निरागसता आणि उत्कट इच्छेला,  श्रद्धेची जोड देणारा साधारण  मनुष्यसुद्धा असाधारण कर्तृत्व  करू शकतो हे वारंवार सिद्ध झाल्याचं दिसून येतं.  


 नाग  पंचमी — अष्टमी 

आज नाग पंचमी,  विहिरीला पाणी वाढविण्यासाठी विहीर खोदायचा मुहूर्त होता. मुहूर्त छोटू काकांच्या हातानंच करायचा ठरवला होता. पण नऊ झाले, दहा वाजले तरी ते मळ्यात पोहोचलेच नाही. “छोटूची अजुन एक तास वाट पाहू” असं सगळ्या भावंडांनी ठरवलं. “नाग पंचमीला काहीही काप, चिर, तोड, फोड करत नाहीत, कोणत्या गुरुजींनी आजचा मुहूर्त काढला?” ताई आजी विचारत होती. “नेहमीचेचं भटजी, त्यांनीच काढला मुहूर्त. खास निरोप आहे त्यांचा,  छोटूच, पहिली पहार मारेल.” अण्णा काका आणि नाना काका एकदम बोलले.  दरम्यान गुरुजी पोहोचले. अगोदरच वीस फूट खोल असलेली विहीर अजुन खोदायची, गाळ उपसायचा म्हणजे अठरा वीस कामगार तर असावेच लागतील. श्री… न,  कल्लापला हाताशी घेऊन, त्याची सर्व तयारी केली होती. मुहूर्त साधण्यासाठी अवजारे, बुट्ट्या, कामगार माणसं सगळं जमवलं.   विहिरीभोवती  माणसचं, माणसं दिसतं होती.  “अजुन एक तास वाट पाहू  छोटूची,” गुरुजी बोलले. घड्याळात अकरा वाजले होते. गप्पा सुरू झाल्या. बाहत्तरचा दुष्काळ मी म्हणत होता. सर्वत्र उष्मा भरून राहिला होता. झाडं, वेली टवटवीत दिसत नव्हती.  आता संपूर्ण वीस एकर शेती पाण्याखाली आणणं शक्य नव्हतं. दिवसेंदिवस पाणी कमी कमी होताना दिसत होत.  पाण्याने  ओसंडून वाहणाऱ्या आसपासच्या सर्व  विहिरीनी तळ गाठला. सर्वत्र तीच परिस्थिती होती. पण पावसाची वाट न पाहता, विहिरीतील गाळ काढून आणखी खोल खोदायचा निर्णय घेतला. “नाग  पंचमीला विहीर खोदायला सुरू करायची का?” हा ताई आजीने विचारलेला प्रश्न निरुत्तर राहिला. आज सगळे त्याचसाठी मळ्यात जमले होते.
 विनिता अडीच महिन्याची ओली बाळंतीण. श्री… विनिताची तिसरी मुलगी, सई छोटंसं बाळ. मळ्यात तुटपुंज्या वस्तुसहित नव्यानं राहायला आलेले. श्री…., विनिता,  ताई आजी अपुऱ्या सुविधा बरोबर तडजोड करायचा प्रयत्न करत होते, आणि त्यातच  विहीर खोदायचं   मोठं काम काढलं. छोटू काका, महाराष्ट्रात दुसऱ्या गावी नोकरी करत होते. आणि आज  त्यांच्या हातून मुहूर्ताची पहार मारायची होती. ना ते आले ना  पत्र, ना तार आली. शेवटी वाट पाहून कंटाळले सगळे. “आजचा मुहूर्त वाया नका जायला,  श्री… तुझ्या हातानी मुहूर्त करू, म्हणजे कामगार त्यांचं काम सुरू करतील.” गुरुजींच्या उपायाला सर्वांनी मान डोलवून संमती दर्शवली. विहिरीत असलेलं पाणी पाईप लावून उपसून काढलं. विहिरीच्या तळाला तीन जिवंत झरे दिसत होते आणि सतत पाणी पाझरत होत. तळाजवळच्या विहिरीच्या भिंतीला,   कोनाड्यासारखी मोठी जागा होती. आरामात एक माणूस बसेल इतकी मोठी जागा होती तिथून पाणी खूप येत होत. गुरुजी बोलले, “तिथंच मोठा जिव्हाळा आहे. पाण्याची धार लागेल. बरोबर कोनाड्याच्या डाव्या बाजूला बोटं दाखवून,  पहार मार श्री…”  गुरुजी बोलले. कल्लाप्पान   श्री … च्या हातात  पहार दिली. श्री… न पहार घेऊन जोरात विहिरीच्या झऱ्याजवळ मारली आणि भुसभुशीत मातीचा मोठा  ढेकळl  खाली पडला,  त्यासरशी  फुस्स sss आवाज आला आणि  फुत्कार टाकत आपलं काळकभिंन्न अंग सळसळवत नाग बाहेर आला. त्याच्या फण्यावर पिवळ्या रंगामध्ये दहाचा आकडा स्पष्ट दिसत होता. प्रसंगावधान दाखवत कल्लापा ओरडला, “मालक पळा”, आणि श्री…ला अक्षरशः  हाताला धरून खेचत विहिरीच्या पायऱ्या चढून धावत विहिरीजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली दोघेही पोहोचले.   पायऱ्या मातीच्या होत्या. दगडाने बांधलेल्या नव्हत्या. त्यामुळे खडे, माती, ढेकळ पायाखाली येत, तेव्हा सांभाळूनच चालावं लागे.  नाग पंचमी म्हणजे सापाला मारायचं नाही आणि स्वतःसह सर्वांचा बचाव करायचा होता म्हणून धावत आले कल्लपा, श्री.. आणि इतर सगळे.  परंतु त्या दिवशी काम तिथंच थांबवलं.  सगळेजण पांगले. दुसरे दिवशी सकाळी काम सुरू झालं ते संध्याकाळ पर्यंत सुरूच होत. सगळेजण दुपारी जेवणासाठी फक्त एक तास घेत आणि पुन्हा जोमाने काम सुरू ठेवत.

अनु, अक्कू, तान्ही मध्येच चुलवण मांडून जेवण बनवत होत्या. सकाळ, संध्याकाळ चहा, भडंग खाली विहिरीत पोहोचवला जायचा.
आज  तिसरा दिवस. सकाळ पासून अंग मेहनतीचं काम करून सगळ्यांना सडकून भूक लागली होती.   पानमळ्यातून हिरव्या उलट्या लटकलेल्या झणझणीत मिरच्या आणि विड्याची पानं तान्ही बाईनं आणून ठेवली.  अनुनं हिरव्या मिरच्या आणि  शेंगदाणे चुलवणावरच्या  खोलगट तव्यावर टाकून तेल सोडलं. सगळं   परतवून  घेतल.  तवा खाली उतरवून खडे मीठ टाकलं आणि जवळ असलेल्या छोटया काळया मडक्याने ठेचा बनवला. जेवण तयार झालं होतं .
रोज जेवणाच्या वेळी, पाईप लावून पाणी बाहेर काढलं जायचं. कल्लापान मोटार सुरू करून दिली. विहिरीतून सगळे बाहेर येऊन हात पाय धुवून जेवायला बसले. भाकर, ठेचा, ताक आणि खिचडा खाल्ला सगळ्यांनी. विड्याच पान खावून झालं तसे सगळे कामाला लागले.


 श्री…. कामावर लक्ष ठेऊन होता.  दुपारचं जेवण त्यानं ताई आजी आणि विनिताबरोबर घेतल. पानमळ्यातून  पानं आणून ठेवलेली होती. विनिताला विडा आवडतो म्हणून श्री … ने स्वतःच्या हातानी विडा बनवला. विड्याच्या पानामुळ दोघांची तोंड लाल झाली होती.  एक पान खाऊन समाधान न मानता दुसरा विडा तयार करून हातात घेऊनच,  तोंडात  पान असल्यामुळे ताईआजीला काही न बोलताच श्री… ..  घराबाहेर  पडला.

श्री… बाजूच्या  खोपीला वळला.  पाण्याच्या पाटाच्या दोन्ही बाजूला   सीताफळाच्या झाडाच्या रांगा होत्या.  पाण्याचा पाट ओलांडून बाभळीच्या झाडाखाली विहिरीच्या पायऱ्या जवळ आला. खालून पहारी, कुदळ, फवड्याचा खणं, खणं आवाज येत होता. तीन लोक खणत होते. दोन गाळ, माती बुट्टीमध्ये भरत होते आणि बाकीचे साखळी करून भरलेल्या बुट्ट्या वर आणून टाकत होते. प्रत्येक चौथ्या पायरीवर एक माणूस उभा होता आणि ते गाळं माती  भरलेली बुट्टी वर पाठवत होते आणि रिकामी बुट्टी विहिरीत खाली  पाठवत होते. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न होते. काहीवेळेस  गाळ, माती  भरलेल्या बुट्टीतून  खडा, माती पायरीवर पडला तर अलगद बाजूला ढकलावं लागत होतं.  पायरीवर एक माणूस उभा राहिला की दुसऱ्या माणसासाठी फारशी जागा  राहत नव्हती.   
लोक काम करताना बघून, श्री… चा  उत्साह वाढला.   स्वतः ला सांभाळत पायरीवरून विहिरीत खाली जाण्यासाठी निघाला. एका हातातील पान तोंडात टाकत दुसऱ्या पायरीवर पाऊल ठेवलं. पायाखाली खडा आहे, हे कळत असतानाच  पाहिलं पाऊल स्थिर व्हायच्याअगोदर, दुसरं पाऊल उचललं आणि खडा पायाखालून निसटला आणि त्याबरोबर श्री…पण डायरेक्ट खाली…. कातळावर पडला. पट्टीचा पोहणारा श्री… त्याचे डोकं खाली आणि पाय वर होते. आणि विहीरीत अर्धा पुरुष एवढंपण पाणी नव्हतं.    “मालक sss…. मालकssss….  मालक पडलेssss.. “चा गलका झाला. उचलुन …. तालुक्याला नेलं श्री…ला.  

अक्कू, अण्णाप्पानं   गाडी करून विनिता, ताईआजी आणि सई बाळाला गावातल्या वाड्यात घेऊन आले. नेमक काय झालं हे विनिताला, ताई आजीला माहीतच नव्हतं….

 आणि …..
रश्मी शाळेतून आली.  उमेश दादा,  लोचन,  सूची अक्का, संजू  अक्काबरोबर जेवली.  बाहेर अंगणात आली सगळी मूलं.
सूची, संजू, छाया, लोचन, उमा, वनिता, चंदा काचेच्या बाटल्यांचा बंगला बनवत होत्या. त्यातल्या दोन बाटल्यांमध्ये पाणी भरून रश्मी, ‘अत्तर दाणी, गुलाब पाणी‘ म्हणून खेळत होती. अचानक काही माणसे वाड्यात पांढऱ्या कपड्यातून काहीतरी उचलून  घेऊन येताना दिसली आणि पाठोपाठ घरातून   हृदय चिरणारा टाहो आला. ….


2. आणि श्रद्धा असेल तरच ….

आज अष्टमी, तेरा वर्ष झाली, श्री… जाऊन.  महिनाभर अगोदर स्वप्नात येऊन विनिताला सांगतो “मी जेवायला येतो”, म्हणून आणि सप्तमी अष्टमीला स्वप्नात येऊन, “विनी, मला खूप भूक लागली आहे. जेवायला वाढ”, म्हणून सांगणार. नवमीला सांगणार “माझ् पोट भरलंय” म्हणून.  अखंड …सतत… तेरा वर्ष……विनिताचा श्री… शी संवाद चालू असतो. मुलींचं शिक्षण, दहावी, बारावी, आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी मिळणार बळ… श्री…. चा आशीर्वाद. रश्मीची बारावी झाली, तेव्हा विनिताला श्री…ची उणीव जास्त भासली. 

सकाळ झाली तशी, पटापट आवरून विनिता, चंदा आणि सई वाडीला रवाना झाल्या. साडेदहा अकरा वाजता वाडीत गुरुजींच्या घरी पोहोचल्या तिघी.  काका तेथेच भेटले. आणि नेहमीसारखं श्राद्ध पार पडलं. आता श्री जेवला होता.. विनिता, चंदा,सई समाधानान  गुरुजींच्या घरातून  काकांबरोबर बाहेर पडल्या. दत्त दर्शन घेऊन निघाले सर्वजण. कितीही अडचण आली, पैशाची तंगी असली तरी अष्टमीला श्रद्धापूर्वक श्राद्ध हे झालच पाहिजे हा कटाक्ष पाळला विनितन. कारण पैशाच्या अडचणी मुळे एक वर्षी अष्टमिला श्राद्ध केलं नव्हत.  रात्री स्वप्नात येऊन, “मी आज जेवणासाठी आलो होतो. खूप वाट पाहिली  पण तू मला जेवण वाढायला आलीच नाहीस विनिता. मी भुकेलाच राहिलो बघ“. म्हणून  स्वप्नातच श्री … अदृश्य झाला, पूर्ण वर्षभर विनिता अस्वस्थ राहिली. उणापुरा आठ वर्षाचा संसार श्री… विनीताचा पण मनानं एकमेकाला अतूट जोडलेले होते दोघे. 

पटवर्धन काका आणि वैभव लक्ष्मी व्रत

वहिनीसाहेब, घरी चला. आज उर्मिसाहेब तुम्हाला एका खास व्यक्तीला भेटवणार आहे. पुट्टु काका सर्वांच्या नावापुढे साहेब पदवी लावून बोलायचे. आता पण त्यांनी बायकोच्या नावापुढे साहेब जोडलं होतं. त्यांच्या अशा बोलण्यामुळे चंदा सई खुदकन हसल्या ! “चांड्यानो माझ्या बोलण्यावर हसतात काय?” म्हणून चंदाच्या डोक्यात टपाली मारली.

  सई , चंदाची उत्सुकता शिगेला पोहोचली. संध्याकाळी म्हणजे चार वाजताच तयार होऊन बसल्या.

 ताशीव दगडी कमानीतून आत गेलं की, जुईचा वेल दिसला. प्राजक्त कळ्या हळुच एक, एक पाकळी उमलवत होत्या. मंद सुगंध संपूर्ण अंगणात भरुन राहिला होता. सोन चाफा झाडावर फुलला होता आणि   पाकळ्यांचा  वर्षाव करत होता.  आत डाव्या बाजुला तुळशी वृंदावन होत. त्यात काळी तुळस होती, मंजिरी बाहेर डोकावत होत्या. पिवळ्या दरवाजातून मंजुळ आवज आला, “आत या वहिनी”. आवाजाच्या दिशेनं पाहीलं  पुट्टू काकू आणी विनितानं. साधारणपणे साठ पासष्ट वर्षे वयाच्या सोज्वळ प्रौढ बाई, काकुना आणि सर्वाना आत बोलवत होत्या.  “तुम्ही बसा हं थोडावेळ, हे  बहेर येतील.” हसुनं   त्यांनी पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र समोरच्या टीपॉयवर ठेवलं आणि त्या आत गेल्या. चंदा आणि सई  दोघी बहिणी चुळ्बूळ करु लागल्या, तस पुट्टू काकू बोलल्या, “आता आपल्याला ज्यांनी पाणी दिलं त्या भाग्यश्री  पटवर्धनच्या काकू आहेत. आणि आपण भाग्यश्रीच्या काकांना  भेटायला आलो आहोत.” आता सई, चंदा खुप उत्सुक झाल्या.

ते खूप ज्ञानी, तपस्वी आणि तेजस्वी दत्त भक्त आहेत. आता ते ध्यानस्थ बसले  आहेत“. काकू पुढे बोलल्या.

काकू बोलत असताना आवाज आला….”नमस्कारss, नमस्कार मंडळी s s,” धीरगंभीर आणि उस्फूर्त भाव शब्दातून प्रतित होत होते.  ते पटवर्धन  काका होते. केवड्याचा रंग, पिंगट काळसर डोळे, सहाफूट उंच, मानेवर आणि गळ्यावर सुरकुत्या दिसत होत्या. त्यांच्या सुरकुतलेल्या मानेवर सोन्याची चेन लकाकत होती. नुकतच  जागा झालेल्या लहान बालकासारखा त्यांचा चेहरा टवटवीत दिसत होता. चेहरा आणि   बोलण्यातून प्रसन्नता झळकत होती. आईच्या मिठीतून नुकतच बाहेर पडलेले मुल कसं खुश असत तसा भाव जाणवला त्यांच्या नमस्कारातून.  विनिता, चंदा, सईशी एकदम सहज आणि खुप जुनी ओळख असल्यासारखं बोलतं होते.  

“काका तूम्ही ध्यानस्त होतात, अस काकू बोलल्या”, चंदाने  पृच्छा केली

 “हं, ब्रम्हानंदी लागली टाळी, तेव्हा देहा ते कोण सांभाळी?” पटवर्धन काकां आकाशाकडे बोट दाखवत पापण्या मिटुन बोलले. त्यांच्या बोलण्यातून, ध्यानातून मिळणारा अपार आनंद आणि समाधान मिटल्या पापण्यातून सुद्धा चेहऱ्यावर दिसतं होतं. त्यानी प्रसन्न मनान, स्वतःच्या हातून एक छोटं पुस्तक विनिताच्या हातात दिलं आणि व्रत सांगितलं. एकदम सोप. ना उपवास, ना भपका. साधं, सोपं आणि प्रभावी. शुक्रवारी संध्याकाळी उंबरठ्यावर,  दारात रांगोळी काढायची. घरात एका ठिकाणी  साफ करुन रांगोळींने अष्ट दल कमळ रेखाटायचं ||ॐ श्री नमः|| || जय लक्ष्मी माता || लिहून हळद कुंकु वहायचं. वर पाठ ठेवून वाटीत सोन्याचा दागिना ठेवायचा. लाल🌹 फुल,आणि हळद कुंकु वाहुन नमस्कार करायचा.  पुस्तकात दिलेलं चार ओळींचं स्तोत्र म्हणायचं.

या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी।
आरक्ता रुधिराम्बरा हरीसखी या श्री मनोल्हादिनी।
या रत्नाकर मंथानालप्रगटीता विष्णोश्च् या गेहींनी।
सा मां पा तू मनोरमा भगवती लक्ष्मीश्च् पद्मावती।। 🙏
ॐ श्री नमः||, || जय लक्ष्मी माता||🙏🌹

पाटावर पुस्तक ठेउन हळदीकुंकु,🌹🌺 फुल वहायच आणि प्रार्थना करायची. दुध साखर, फुटाणे साखरेचा नैवेद्य दाखवायचा. एकाशे आठ वेळेस “ॐ श्री नमः” हा जप करायचा  दिवसभर, स्वतःला प्रसन्न ठेवायचं. आणि घरातील सर्वांनी प्रसन्न राहायचं. काकांनी थोडक्यात सांगितलं. पटवर्धन काकाना नमस्कार करुन बाहेर पडल्या. विनिता, चंदानं  प्रसन्न मनानं शुक्रवारी, वैभव लक्ष्मीची पुजा करण्याची तयारी केली. 

One Response

 1. छान,
  तुम्ही डोळ्यासमोर प्रसंग उभा करता.
  ठेच्याच वर्णन वाचून माझं गाव आठवलं.
  लिहीत रहा आम्ही वाचत राहू.
  पण एखादी सिरीयल पहिल्याच फीलिंग येत, एवढं नाट्य भरलेलं असत.
  तुम्ही कादंबरी पब्लिश कराच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More