“तू सदा जवळी रहा.. ” भाग – 32, अर्थात रंग आणि बरंच कांही

रंग किती ❓️🌈 नवरंगांचा रंगीत मेळा ओळखा पाहू ..

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चोरीची समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली.

भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.


रंग किती ❓️🌈 नवरंगांचा रंगीत मेळा. ओळखा पाहू ..

“रश्मी मॅडम, संध्याकाळी चार वाजता मीटिंग ठेवलीय मॅनजमेंटने.  तुमच्याबाबत कांही निर्णय घ्यायचा आहे. तुमच्या   जबाबदारीबाबत बोलणार आहेत”. शिवम सरांनी रश्मीला व्यवस्थानाचा निरोप कळवला.  रश्मी पुन्हा साशंक झाली.  तिचा चेहरा उतरला. “लंच  टाइम होने के बावजुद, रश्मी मॅडम स्टाफ – रूम मे क्यूँ बैठी है बाबा जी?”  सुरेखा मॅडमनी; बाबाजीना विचारलं.  “मॅडम जीss” बाबाजींनी रश्मीला हाक दिली.   रश्मीची मान खाली,  पापण्या अजून खाली झुकलेल्या आणि विचारत बुडालेला चेहरा.  समोर आपले सहआध्यापक  कांही बोलताहेत,  हाक मारताहेत याचं भान नव्हतं.  “चला,  जेवायला जाऊ. जेवणाच्या ब्रेकनंतरपण  मला कंटिन्यू सर्व  पिरिअडस  आहेतं”. हिस्टरीच्या  मॅडम,  रश्मी जवळच्या खुर्चीत बसत, टेबलवर बॅग आणि इयत्ता आठवी आणि नववीची  सिलॅबस बुक्स ठेवत बोलल्या.  त्यांच्या हाताची बोटं खडू वापरल्यामुळं पांढरी  दिसतं होती.  त्यांनी घातलेल्या निळ्या जीन्सवर खिशाजवळ पांढरी बोटं उमठली होती.  
सर्वात सुंदर काळा  रंग, वर्गातील फळ्याचा आणि सर्वात सुंदर पांढरा  रंग खडूचा.  त्यावर पण  हिस्टरीच्या मॅडमनी   एक सुंदर नाटक बसवलं होतं.  प्रत्येक विद्यार्थ्यंला एक,  एक  रंग देऊन रंगांची जुगलबंदी  प्रभावी मांडली  होती.  विबग्योर 🌈( V I B G  Y O  R )  ता ना  पी ही नी पा जा असुदे किंवा🌈 जा ता ना ही पा नी  पी  सर्व रंग डोळ्याला भावत होते आणि कित्येकांच्या हृदयात आपलं स्थान पक्क केलं होतं. पण बाजूच्या दोघानी आपले चेहरे हिरमुसले ठेवले होते.  ते दोघे कोणाच्या खिजगणित नव्हते.  रंग तर सातचं असतात.  मग  हे आणखी दोन रंग कोणते आणले मॅडमनी ? प्रत्येक रंगाची  एकपात्री  नाटिका,   पाहणाऱ्याच्या मनात पण प्रश्न❓️  निर्माण झाले. 
हिरवा – 🌳  हिरवे हिरवे गार सुंदर,  झाडं  हिरवी,  वेली   हिरव्या म्हणत,   हिरवा जास्त टेम्बा मिरवायचा. ‘हिरवं हिरवं रान; सुंदर  है झाकी,  मला पाहिलं डोळे भरून, आता काय राहिलं बाकी?”   आपल्या विविध छटा सांगितल्या,  आपण नसलो तर जग नसेल हे सांगताना  त्याची छाती अभिमानाने फुगून आली होती.   
लाल रंग –   🍅 रक्त लाल,  कुंकू लाल,  आहे का यावर कोणाचा सवाल ❓️ मी नसेल तर नसेल कांही,  फुकाचं तुमची  स्फुरते💪 बाही.  माझ्या पासून जीवन सुरु,  आता प्रश्न?  नका करू. प्रेमाचा गुलाब 🌹 हवा लाल,  म्हणून  म्हणतो; लालशिवाय,  सारे बेहाल.  🍒
 नाचत आली नारंगी – नारंगीचा 🍊नखरा न्यारा,  नागपूर का संत्रा हैं,  सबको प्यारा,  खाओ संत्रा,  पीओ जूस,  उन्हाची झळ होईल फुस्स.   लक्षात ठेवा मी नारंगी,  माझ्याशिवाय जीवन होईल बेरंगी. 
 पिवळा – 🌞पिवळा मी,  ☀️ शुभ कार्यात होतो हळद,   लिंबू🍋 रंग खुलतो सर्वाना,  सर्व श्रेष्ठ असे मी राणा,  माझा असे  स्वतंत्र बाणा.  दृष्ट काढतो मी,  घोडयावरच्या नवरदेवाची. 🌞 पिवळा देखणा,   पिवळा सुंदर,  पिवळा मी झळाळे. सोने सुद्दा धमक्क पिवळे,  पासंगाला  सर्व कावळे.  हाच  जाणिजे सिद्धांत,  मीच असे श्रेष्ठ अवघ्यात. 
 निळा -💧💧 जल निळे, आकाश निळे याहून मोठे,  कांही असेल का बरे?   🌀 रंगांच्या  या जुगलबंदित मीच येणार  पहिला नंबर,  बाकी सारे निळ्या नंतर.  
पारवा – रंगांच्या या 🐀 🦆अजब भांडणात मीही आलो जिंकायला. शांतीचा संदेश देतो🦆  कबुतराच्या रूपाने.  म्हणून मी घुमतो मनात साऱ्यांच्या,  शांतिः संदेशामुळेच  विजय माझा.    जांभळा – जांभळा रंग फुलाचा; छोट्या जांभूळ 🍇 फळाचा.  पाखरे आकर्षिती फुलाकडे,  जांभूळ औषधी,  रोखी  साखरेला. 🍆 मीच असे श्रेष्ठ सर्वात.  
  सप्त रंगांचा🌈 सोहळा झाला संप्पन.  आता आला रंग, ज्याला कोणी रंग म्हणतच नव्हते.  कांही वेळेस वापरायचे हिणवायला.  तशीच केली सुरवात बोलवायला,  🌑 👈 ये काळ्या,  ♠️👈 ये काळ्या सप्तरंगांचे आवाज मिसळले एकमेकात.  गलका केला साऱ्यांनी. कोलाहल उठवे  शूळ   मस्तकी.  काळा –  खणखणीत आवाज,  जसा टणत्कार प्रत्य्नचेचा,  आत्मविश्र्वास डोकावला बोलण्यात,  चिडीचूप झाले सप्तरंग.  मी तर सर्वाहून न्यारा,  मुलांच्या नजरा अन भिस्त ⬛️ माझ्यावर सारी. रात्र काळी म्हणून शुभ्र दिवसाला महत्व. चंद्र,  चांदणे  चमके माझ्यामुळे. घाबरू नका सारे,  तुमचा उगम होतो आम्हातून.  आता साऱ्यानां  प्रश्न❓️ पडले.  “आम्ही,” का म्हणतो 🖤 हा काळा
?  पण खरंच किती सत्य होतं त्याचं म्हणण. रंग ओळखायला शिकण्यासाठीपण खडू – फळा लागतोच ना?   पांढरा  – 💭 एंट्री झाली पांढऱ्याची.  📃मुरडली नाके 😗😗 सर्वांची.  वाटलं सर्वाना वाया गेला  ढवळा,  काळ्याजवळ बांधला.  याला वापरतात “राम नाम सत्य” वेळी. याचं काय ऐकायचं ❓️वाया जाईल  वेळ आपला. कोणी म्हणती पांढरा,  ढवळा कोणी म्हणे.  शुभ्र मी दिसे,  शुद्ध मी असे.  तुम्हा साऱ्यांमध्ये; ‘मूळ’ मीच असे. 
“ओ‼️  हो ‼️  पण, ते कसे❓️  ते कसे❓️  सांग आम्हाला,  दे तू दाखला : नाहीतर तू सर्वात धाकला.  आमच्यातलं,  तुझं दाखवं अस्तित्व.” सप्त रंगात मिळाला आठवा आणि विचारला दाखला. 
‘गांधीजींचा मी सफेद पंचा,  शेतातला सफेद कापूस,  शिवाला आवडतो; शुभ्र  फुलातून मी,  पण त्यापेक्षा वेगळाच घ्या तुम्ही दाखला.
“कोणता दाखला?  दाखव आम्हाला” एकत्र अष्ट रंगानी विचारला प्रश्न.  “यारे या, सारे या.  मिळून खेळू खेळ अनोखा. “पांढरा सगळ्यां रंगाना गोल करायला सांगत होता.  चला सारे; हात पकडा;  करा गोल; ऐका sss, झपुर्झा, खेळा झपुर्झा…. रिंगण करूनी  जोरदार, गोलगोल  फिरू आपण,  भिंगरी सारखी घेता गिरकी : सर्वाना होईल साक्षात्कार,  हर्ष खेद ते मावळले,  हास्य निमाले, अश्रू पळाले कंठक श्यल्ये बोथटली,  मखमालीची  लव उठली. कांही न दिसें दृष्टीला,  प्रकाश गेला तिमिर हरपला काय म्हणावे या स्थितीला,  पांडु-रंग म्हणावे या स्थितीला,  पांडुss – रंग म्हणावे या स्थितीला. पांडु ss – रंग sssss पांडुss – रंगssss पांडुss-रंगssss… 
  सप्तरंगाचा सोहळा 🌈 आणि ‘काळा’ मिळून सारे आठ  रंग पाहणाऱ्या  मुलांबरोबर रमले अन शब्द घुमले, रंग घुमले अन  मिसळले. अष्टरंग पांडुत  की, अष्टरंगात मिळाला सफेद?   “नवरंगाचा एकच नारा मुठ्ठीमे  है विश्व हमारा ‼”   एकीमुळे उधळला  आनंद,  विखुरला आमोद साऱ्या विश्वात,  रंगांचा अजब अनोखा सोहळा स्थिरावला हृदयात. 
 रश्मीच्या मनात नाटुकली प्रवर्तली.  दरम्यान हिस्टरी मॅडमनी  जवळच्या बेसिनमध्ये हात धुतला.  संस्कृत मास्टरनी हिस्टरीच्या मॅडमना,  रश्मीबद्दल डोळ्यांनं खुणावून विचारलं?  त्यांच्या प्रश्नात, रश्मीचं शून्यात नजर लावण्याचं करणं जाणण्याचा हेतू होता.  “कुछ नही मास्टरजी,  इसकी आदत  जो हैं,  बिना बजह चिंता करनेकी॥‌”  हिस्टरीच्या मॅडमनी संस्कृत मास्टरांच्या अबोल प्रश्नाला उत्तर दिलं. “मीटिंग जो लगाई हैं मॅनेजमेंटने,  उसके बारेमेही  सोच रही होगी॥” छोट्या मॅडमनीं अंदाजाने करण सांगितलं.   आपल्या मनातली घालमेल आणि विचारातील भाव  चेहऱ्यावर आपसूकच येतात. चेहऱ्यावरच्या भावातून  मॅडमनी नेमका निष्कर्ष काढला. चेहरा वाचायला छान जमत मॅडमना.   रश्मीने नजर वर उचलून, बळेच चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न केला  पण तो  बऱ्यापकी  फसला. चेहऱ्यावर मुद्दामहून हसू आणल्याचे  स्पष्ट दिसलं.  


मेसमधली गजबज 

आज मेसमध्ये लवकर जेवायला बोलावल्याचा निरोप देऊन, योगी स्वताच्या घरी जेवायला निघून गेला. 
  रश्मी जबरदस्तीने सर्वांबरोबर जेवायला गेली मेसमध्ये. वातावरण बदललं आणि समोर मुलांचा चिवचिवाट ऐकून जड  मन,  बरंच हलक झालं. 
 आज मुंबईहून कॉलेजच्या मुलांची ट्रिप आली होती.  ट्रिपमधील मुलांकरिता जेवणाची मोठी पातेली वेगळी ठेवली होती.  भात,  पापड,  लोणचं,  कांदा  आणि हे काय दिसतंय  पांढर❓️  गोल, लाल आमटीत बुडवलेलं,  मोठ्या रसगुल्ल्यासारखं. काय असेल?
“मॅडम,  ते आपल्यासाठी नाही. अंडाकरी आहे ती”  विज्ञानाचे सर बोलले.

  कॉलेजचे विद्यार्थी,  स्वतःचं जेवण स्वतः  वाढून घेत होते.  दरम्यान होस्टेलच्या मुलांनी; मेस समोरच्या शेडमध्ये: ओळीनं बसून घेतलं. मावशींबरोबर  मोठ्या  मुलानी  जेवण वाढायला सुरुवात केली. पोळी,  भाजी,  भात आणि आमटी बरोबर लोणचं आणि पापड वाढलं.  आणि मावशींनी मुलांच्या पानात गुलाबजामून ठेवला; तसं मुलं खूश झाली. “आज,  किस खुशीमे स्वीट डिश,  मावसी ?” सायन्स टिचरनी, मराठी मिश्रित हिंदी बोलत  पृच्छा केली.  “पता नही,  बनानेके के लिये बोला, तो मैने बना दिया | शायद शाम को पता चलेगा |” मावशी गालातल्या गालात हसत,  संस्कृत मास्टरजीकडे पाहत  बोलल्या.  “क्या बात हैं माशाय ?  बता भी दिजीए |,” मॅथ्स टीचर बोलले.  एकमेकांशी संवाद करताना वातावरणात हलकेपणा जाणवत होता.  रश्मी सैलावली होती.  जेवण वाढून घेता,  घेता दरवाज्याकडे  लक्ष्य गेले,   सगळे व्यवस्थापनाचे लोक; मेसमध्ये चक्कर टाकून, परत  निघाले होते.   दवाखान्याच्या शिबीराचे लोक, मुंबईहून ट्रीपला आलेली कॉलेजची  मुलं आणि हॉस्टेलची आणि नियमित मेस मेम्बर्सची एकाच वेळी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली जाई. म्हणजे आपल्यानंतर दवाखान्याच्या शिबिरातील सत्तर लोक जेवणार आहेत अजून❗️ कॉलेज ट्रीपला आलेल्या मुली, संध्याकाळी मावशीना  किचनमध्ये; काप – चीर करायला स्वयंस्फूर्तीने मदत करायच्या.   मावशीपण तेवढ्याचं उत्साहानं आणि प्रेमानं स्वयंपाक  बनवायच्या आणि आग्रहानं जेवण  वाढायच्या. आज किचनमध्ये कॉलेजची चिनी मुलगी कोथिम्बिर साफ करुन देत होती. मावशीचं कौतुक वाटलं रश्मीला.  सकाळ,  दुपार,  संध्याकाळी न कंटाळता किचनमध्ये रांधत राहायचं.  हसऱ्या चेहऱ्यानं. ताई आजी,  विनिता आई,  तिघिही काकु मंडळी,  सर्व आत्यामंडळी   मावशीमंडळी कधीही नं दमणाऱ्या,  न थकणाऱ्या खास आनंदाचा डोस पिऊन आलेल्या महिला.  आजपर्यंत कधीच हिरमुसलं किंवा दुःखी पाहिलं नाही मेसमध्ये  मावशींना.  सुखानं  आणि आनंदाने भरलेला संसार आणि  तीन लहान  मुलांची जबादारी जोडीदारावर सोडून गेला त्यांचा जीवनसाथी.  कधीकधी फावल्या वेळी मैत्रिणी   व्हायच्या एकमेकींच्या रश्मी आणि मावशी.  तेंव्हा आपसूक बाहेर आलं गोठलेलं दुःख,   मावशीचं  मन हलक झालं. 
मुलं आणि शिक्षक,  इतर नियमित मेंबर जेऊन बाहेर पडले आणि ऑफिसच्या बाजूने पाटील  बाई, आणि त्यांच्या शिबिरातील बायका गाणं म्हणत, म्हणतच मेसच्या हॉलकडे निघाल्या होत्या. बऱ्याच आदिवासी वयस्कर  बायका, अर्धी साडी नेसलेल्या होत्या.  उन्हामुळे चेहरे रापलेले होते.  पण कामाचा उत्साह चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. विविध रंगांच्या साड्या आणि ब्लाऊज  परिधान केलेल्या बायकानी   लाल,  निळ्या,  जांभळ्या रंगाची फ़ुलं केसात खोवली  होती. आणि चालतं – बोलतं  एक मनोहारी,  सुंदर दृश्य तयार झालं होतं. “रश्मी ताईss” म्हणून आवाज आला.  घोळक्यातून वाट काढत बकुळनं हात उंचावत, रश्मीचं लक्ष्य वेधून घेतलं.  बकुळन आकाशी निळ्या रंगाची साडी आणि त्याच रंगच ब्लाउज घातलं होतं.  “तुला छान दिसतो हा आकाशी रंग.  बकुळ. तू पण शिबिरासाठी आलीस का?”  रश्मीने विचारलं.  
“होय ताई,  पाटील बाईंनी बोलावलं आज मलापण.  एकाच वेळी  दीडशे बायका आहेत.” बकुळ उतरली.   “काय ❓️आज एकाच वेळी एवढ्या लोकांना बोलावलं डॉक्टरनी?  रश्मीने प्रतिप्रश्न केला.  “पुढच्या आठवड्यात डॉक्टर, बेंगलोरला जाणार आहेत.  म्हणून एकाच वेळी ठेवलं शिबीर”. बकुळ बोलत बोलत इतर बायकांच्या गर्दीत मिसळली. 
  आजच्या शिबिराला एक खास व्यक्ती हजर होती.  ती  म्हणजे संस्थेची माजी कार्यकर्ती / प्रोजेक्ट ऑफिसर,  पाटील  बाईंची खास  मैत्रीण. त्यांच्या येण्यामुळं सर्व शिबीर एकदम प्रफुल्लित झालं होतं.  पाटील बाईंच्या मैत्रिणींनं मराठवाड्यात स्वतःची सामाजिक संस्था काढून; स्त्रियांना स्वावलंबी बनवायचा वसा घेतला होता.  त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे संस्थेचा पसारा बराच वाढल्याचं अभिमानाने सांगितलं त्यांनी.  रश्मीला आशा माणसाचं नेहमी कौतुक वाटे.  शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता आणि जिद्द दोन्ही गोष्टीमुळे यश साध्य होतं. कांही प्रमाणात समाजाचे उतराई होता येतं.  त्या ताईंचा आवाज एकदम भारदस्त होता.  त्यांच एक गाणं ऐकायची संधी मिळाली होती रश्मीला. 
तुझ्या कांतिसम  रक्त पताका,  पूर्वदिशी फडकती; अरुण उगवला,  प्रभात झाली,  उठ महा गणपती ||
सूंदर, कर्णमधुर गाणं… वातावरण भारावण्याचं  सामर्थ्य होतं आवाजात आणि डोळ्यासमोर पहाटेच दृश्य उभं राहायचं. 
“आवडतीssss,  तुजsss, आsssss वडती तुज  आवडती तुज म्हणूनि  आणिली रक्तवर्ण कमळे पंचमण्याच्या किरणां सम ही हिरवी दुर्वादळे”
त्यांच्या उच्चारातून लालभडक रंगाची कमळं  समोर दिसायचीच पण आवाजातील गोडवा,  मार्दव हृदयाला भिडायचं. आवाज अगदी टिपेला जायचा आणि वेगळचं गोडवा जाणवायचा.  हवा तसा, कमी- जास्त,  हळुवार,   उतरता बाज, आवाज कसा काय मोल्ड करू शकतात ?  वळवावा तसा वळतो,  आणि भाव ओसंडून वाहतो.  चांगलं जमतं गाणं; कांही लोकांना.  अशा  लोकांमध्ये वातावरण भारून टाकण्याची क्षमता असते.
 एखादी कला,  छंद  अंगी असणं आणि तो  आवडीनं जोपासणं  या सारखा आनंद नाही. आवड असली की,   कामाचा बहाणा करायची गरज नसते.  कलेची उपासना केली की,  ती आपोआप विस्तारत जाते. छंद असावा, त्याचा  ध्यास घ्यावा,  तो जोपासावा,  मनस्वी आनंदानं उपभोगावा.  एखादी कला असावी.  त्यावर आसक्त व्हावं,  झोकून द्यावं.  कलेच्या सवयीचं; व्यसनात रूपांतर व्हावं.  जीवन कलासक्त असावं.  सुगंधी बनवावं. गाण्याच्या आवाजाने मन प्रफुल्लित होतं.  आणि सर्व शिबिरातील बायकांच्या चेहऱ्यावर तिच ख़ुशी दिसतं होती. मेसमधून बाहेर पाडलं तरी,  मेसमध्ये जेवण बनवणाऱ्या मावशीचा चेहरा डोळ्यासमोरून हालत नव्हता.  त्याचं हसतमुख असणं,  जेवायला येणाऱ्या प्रत्त्येक व्यक्तीला माहित होतं. नं कंटाळता सातत्याने किचनमध्ये कामं करणं  कसं जमतं ❓️ अशी कोणती गोष्टी असते की, सर्व बायका  सातत्याने सकाळ, संध्याकाळी नं कंटाळता  स्वयंपाक करू शकतात ❓️त्यावरुन रश्मीला कॉलेजमध्ये असताना बनवलेली स्पेशल डिश आठवली.

रश्मीचं, भरलं वांग 


“आई,  आज सुट्टी आहे. मला एक चांगली डिश बनवू दे ना? ”  रश्मी आई विनिताला आग्रहानं विचारत होती.

  “न .. नको,  तिला नको बनवायला सांगू. बिघडली डिश तर कोण खाणार ❓️” रश्मीच्या दोघी बहिणी एका सुरात बोलल्या.  रश्मीच्या गण्यासारखाच रश्मीच्या स्वयंपाकाचा धसका घेतला दोघी छोट्यानी. त्याच कारण रश्मीला माहीत असून सुध्दा, रश्मी कडून नवीन काही प्रयोग करून घ्यायला दोघींचं ठाम नकार असे.

मी पूर्वीसारखा नाही बिघडवणार पदार्थ.  प्लीज सांग ना मला.” रश्मी आज हट्टाला पेटली.  “विनिता वहिनी,  भाजी आणायला कोण येणार आहे माझ्या बरोबर? ” शेजारच्या वहिनी गॅलरीतून विचारत होत्या.  “आई,  मी जाते वहिनींबरोबर मार्केटमध्ये.” रश्मीच्या डोक्यातला,  किचनमध्ये गोंधळ घालायचा विचार बदलला म्हणून दोघी छोट्या बहिणींनी निश्वास सोडला.  “आई, भाजी काय आणू सांग ना?” रश्मीनं  पर्स घेऊन दारात ठेवलेल्या चपला चढवता, चढवता  विनिताला विचारलं.  छोटी,  छोटी हिरवी वांगी अर्धा किलो आणि चाकवत घेऊन ये.  हिरव्या मिरच्या,  कोथिंबीर,  लिंबू,  काकडी,  गाजर पण आण रश्मी.” विनितानं किचनमधून बाहेर येऊन कापडी पिशवी रश्मीच्या हातात दिली.  “अक्का, मला केळी आणि कलिंगड हवं आहे”. सईंनं फर्मावलं. ठीक आहे म्हणून रश्मी शेजारच्या वहिनींबरोबर बाहेर पडली. हिरण्यकेशी नदीकाठची वांगी खुप चविष्ट असतात.  आत बी अजिबात नसलेली कोवळी छोटी वांगी बघून रश्मी खुश झाली.  भरलं वांग बनवायचा बेत  पक्का झाला.  आई,  काकु दोघी खूप चवदार भरल्या  वांग्याची भाजी बनवतात.  आपण आज आईकडून शिकू,  रश्मीने मनात ठरवलं.  भाज्या,  सलाड, फळं घेऊन, रश्मी घरी पोहचली तेंव्हा,  विनिता ओट्यावर; ताटाखाली काहीतरी झाकून ठेवतं होती.  हात – पाय धुवून रश्मी ओट्याजवळ आली आणि ताट उघडलं.  आईने केलेली जय्यत तयारी पाहून खुश झाली.  शेंगदाणा कूट, खवणलेलं खोबरं,   भाजलेल्या तिळाचं कूट,   सोलून बरीकं छेद दिलीले  छोटे,  छोटे सफेद कांदे,  बटाट्याच्या मोठया  फोडी पाण्यात ठेवलेल्या. बारीक कापलेला कांदा,  गोडा मसाला,  किसलेलं आलं,  धणा –  जिरा पावडर,  तिखट,  मीठ,  गूळ,  राई,  जिरे  आणि तेल. रश्मीने वांगी स्वच्छ धुवून  घेतली.  देठं अर्धं कापून टाकलं,  आणि + आकाराचे दोन छेद दिले.  ” कापलेली वांगी काळी होऊ नयेत म्हणून, पाण्यात ठेवावीं लागतात”. म्हणत विनितानं पाणी घालून, पातेलं रश्मीसमोर ठेवलं. छेद दिलेलं वांग  पातेल्यात ठेवलेल्या पाण्यात टाकलं. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर चिरून विळी बाजूला उचलून ठेवली आणि ताट घेतलं.  एका पातेल्यात मसाला तयार केला.  गॅसवर कडई  ठेऊन. तेल ओतलं. राई, जिरे टाकले.  राई तडकल्यानंतर कडीपत्ता बारीक चिरून, तेलात टाकला आणि गॅस बारीक केला.  ठेचलेला लसूण टाकून,  लाल होईतोवर परतवला. छोटे कांदे कढईत टाकून परतवले. 
बारीक चिरलेला कांदा कढईत टाकून परतवला.  कांदा लाल झाल्यानंतर बटाट्याच्या फोडी कढईत परतवून घेतल्या आणि वांगी भरायला घेतली.  वांगी भरता,  भरता मध्येचं उलथन्यानं मसाला परतवून घेतला.  आता एक, एक  करून भरलेली वांगी कढईत हळुवारपणे ठेवली आणि वरून मसाला पेरला. थोडा पाण्याचा हबका मारून  पंधरा  मिनिटं वाफवून घेतली आणि परतवून कढईवर प्लेट झाकून  ठेवली आणि प्लेटमध्ये वाटीभर पाणी ओतून ठेवलं.  “रश्मी, झाकण म्हणून वापरणाऱ्या  प्लेटमध्ये,  पाणी ओतून ठेवलं की,  भात किंवा वाफेवर शिजणारे पदार्थ करपत नाहीत”. विनिता,  रश्मीला स्वयंपाक करताना अत्यावश्यक टिप्स देत होती.  वांगी शिजताना घमघमाट सुटला.  “वहिनी,  मी भरली वांगी बनवतेय.  तुम्हाला आवडतील ना?” रश्मीने आपण बनवलेली भरली वांगी खाऊन अभिप्राय द्यावेत या अपेक्षेने शेजारच्या वहिनींना विचारलं.  “रश्मी,  एकदम थोडीच भाजी दे.  मी एकटीच वांगी आवडीने खाते.” वहिनी बोलल्या. “ठीक आहे. थोडीचं भाजी  देते”,  म्हणून रश्मीने भाजीचा बौल  शेजारी दिला.   कधीच वांग्याची भाजी न खाणाऱ्या  दादांनी पण भाजी आवडीने खाल्ली.    “रश्मी,  भरलं वांग मस्तच झालं.” दादांनी अभिप्राय पण दिला.  “रश्मी,  फक्त चव चाखली मी. रश्मीच भरलं वांग एकदम स्वादिष्ट आहे बरं का.  आमच्या  कडे  ढकल वांग झालं. तुझ्या  दादानी पण आवडीने खाल्ली भरली वांगी.” वहिनी  बोलल्या.  गृहिणी एखादा खादय पदार्थ बनवते तेव्हा, मेहनतीबरोबर मनं लावून करत असते.  खाणाऱ्याला पदार्थ आवडावा,  चव चांगली व्हावी म्हणून,  आवश्यक दक्षता घेत असते. इतकं करूनही पदार्थ बिघडला तर  इतर कुणी नावं ठेवण्या अगोदर,  तिला स्वतःला त्या बद्दल खूप वाईट वाटत.  कांही वेळेस अपराधी भावना निर्माण होते तिच्या मनात.  कांही वेळेस ती व्यक्त होते. न विचारता चूक कबूल पण करते.  पण मीठ कमी पडल,  तिखट जास्त झालं या वरून आरडाओरड करायचा प्रश्नचं येतो कुठे?  पण मग अशा घटना पाहिल्या किंवा ऐकल्याकी, किंव करावीशी वाटते.  पदार्थ चांगला झाल्याबद्दल जर प्रांजळपणे सांगितलं तर पदार्थ करणाऱ्याचा आनंद द्विगुणित होतो.  आणि नवीन उत्साहानं रोजचं कामकाज आनंदात पार पडत.  सुखी,  आनंदी संसाराचं साधं सोपं गणित. रश्मीला,  भरल्या वांग्याचा प्रसंग जसाच्या तसा आठवला.  स्वयंपाक हार्डली करते  हे पुन्हा प्रकर्षाने जाणवलं रश्मीला.  आणि मेसमध्ये काम  करणाऱ्या मावशींचं कौतुक वाटलं. अन्नदाता सुखी भव म्हणून मनोमन हात जोडले 🙏. 

“रश्मी मॅडम लेटर हैं आपका ।” ऑफीस मधून आवाज आला, तसं रश्मी वळसा घालून आत गेली.  आईच लेटर होतं.  लिहिलं होतं सईन.  15 दिवसांपूर्वीची डेट होती.  एवढं घाईत, “आत्याला भेटायला जा.” म्हणून पत्रात लिहिलं होतं.  आज शुक्रवार आहे.  शनिवार पर्यंत पोहोचायला सांगितलं होतं.  म्हणजे आजचं निघायला पाहिजे.  पण एव्हढं काय महत्वाचं काम निघालं?  फक्त तारीख आणि वार लिहून, पोहोचायला सांगितलं.  रश्मीने रजेंचा अर्ज संजूकडे देऊन, शिवम सरांसाठी निरोप पाठवला. आणि बॅग भारुन, आत्या आणि आईला भेटण्यासाठी निघाली.

कांदे पोहे


पिस्ता रंग,  कॉफी कलरची आऊट लाईन असलेल्या फुलां, पानांचं डिझाईन असलेली साडी,  प्लेन पिस्ता कलरचा ब्लाउज, गळ्यात साधीसी मोत्याची माळ,  कानात  मोत्याचे टॉप, केसाला क्लिप आणि अबोलीचा गजरा माळून रश्मी तयार झाली.  “अग रश्मी, चेहऱ्याला थोडी पावडर लावं,  डोळ्यात काजळ कोर”, आत्या  बोलल्या.  तसं आरशासमोर उभं राहून चेहऱ्यावरून पावडरचा हात फिरवला.  आणि तर्जनीने काजळ घातलं.  “हं, आता ठीक आहे.” रश्मीकडे पाहून आत्या बोलल्या.   आत्यानी बनवलेल्या पोह्याच्या डिश ट्रेमध्ये ठेऊन,  ट्रे  रश्मीच्या हातात दिला, आणि  स्वतः रश्मीला घेऊन हॉलमध्ये आल्या. 
शीडशिडीत बांधा,  सहा फूट उंची,  सावळा  रंग,  फ्रेंच कट दाडी आणि डोळ्यावर चष्मा.  काळी पॅन्ट आणि  लायनिंगचा शर्ट.  समोरच्या खुर्चीत बसून,  छोटू काकांशी बोलत होती ती व्यक्ती. गोव्याला  राहणारे कुटुंब होतं ते.   बरोबर मोठा भाऊ,  वहिनी आणि आई आणि बाबा.   “सिव्हिल इंजिनीअर असून, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहे आमचा मुलगा.”   दोन मुले,   एक मुलगी असलेलं कुटुंब. “आमची रश्मी,  कोकणात  खाजगी शाळेत सर्व्हिस करतेय सध्या.  काकांनी ओळख करुन दिली.  “सर्व्हिस कॉन्टीन्यू करणार का? आम्हाला सर्व्हिसची गरज नाही”  समोरून गोल्डन कलरची फ़ेम असलेल्या चष्म्यातून रोखून पाहत त्याच्या वहिनींने रश्मीला प्रश्न विचारला?   रश्मीने समोर प्रश्नकर्तीच्या डोळ्यात पाहून उत्तर दिलं.  “अर्थात,  सर्व्हिस तर करणारचं.” “बरं,  ते नंतर पाहू,  मला हे सांगा,  मुलीला स्वयंपाक येतो का? ” रश्मीच्या पापण्या झूकलेल्या होत्या. तिनं वर पाहत उत्तर दिलं.  “हो,   थोडा, थोडा करता येतो स्वयंपाक; गरजेपुरता. पण मला मनापासून….” तिचं वाक्य पूर्ण होण्या अगोदर आत्या, मधेचं घाई ; घाईत  बोलल्या.  “चांगलं जेवण बनवते रश्मी. आणि  लग्नानंतर शिकेल तुमच्या हाताखाली.”  “म्हणजे तयार व्हायची आहे अजून.” समोरून नाराजीचा सुरु आला. “मुलीला कांही प्रश्न विचारायचे आहेत का तुम्हाला? ” काकांनी त्या व्यक्तीकडे पाहत विचारलं.  समोर बुबुळांची हालचाल झाली आणि रश्मीच्या चेहऱ्यावर स्तिरावली.  घसा खाकरून साफ केला.  आणि खर्जातला आवाज बाहेर पडला.  “तुम्हाला एखादा छंद,  आवडं आहे का?” “वाचनाची आवड आहे मला,”  रश्मी जेवढ्यास तेवढं उत्तर देऊन गप्प बसली.  “हं. भाऊजींना पण  वाचनाची आवड आहे. दोघे वाचत बसतील.  जेवणाचं कायं ?” मुलाची आई; गप्प, गप्प होत्या.  वडील पण फारसे बोलत नव्हते.  “कुंडली भटजींकडे दिलीयं.  अजून गुरुजींनी काहीचं सांगितलं नाही. “पहिल्यांदा मुलाच्या भावानं  तोंड उघडलं.  “रश्मी तुला कांही बोलायचं आहे का?” छोटू काकांनी रश्मी कडे पाहत  विचारलं.  “मी माझी सर्व्हिस सुरु ठेवणार.”  रश्मी ठामपणे उतरली.  “बाबा,  कुंडलीचं ठीक आहे.  पण मला मुलगी पसंत आहे”. समोरील व्यक्ती  एका दमात बोलून गेली.  “तसं असेल तर, मला अजून कांही सांगायचं आहे.” रश्मी आग्रहाने म्हणाली.  “बाकी बोलणी नंतर करूया कीss” हेल काढतं समोरून कर्त्या  गृहिणीचा  सूचना वजा आदेश झाला.  “तो  सारा नंतरचा भाग. मला,  कांही गोष्टी स्पष्ट बोलायच्या आहेत.” रश्मी आपला मुद्धा लावून धरत बोलली.  “आम्ही गुरुजींशी बोलून घेतो आणि निरोप पाठवतो.” समोरून निरोपाचं बोलणं झालं. व्यक्त होण्याअगोदर मनातला विचार,   रश्मीच्या मनातचं वीरला. समोरची मंडळी निघून गेली आणि छोटू काका,  आत्या,  दादांची एकत्र बसून चर्चा सुरु झाली.  रश्मीनं साडी बदलून पंजाबी ड्रेस घातला.  “अग रश्मी छान दिसतेय साडी. का बदलले कपडे लगेचं?” दादा बोलले.  “मला एस. टी. नं निघायचं आहे.  मी आईला भेटायला निघते. ती  वाट पाहत असेल.”  रश्मी अत्या आणि काकांकडे पाहून बोलली.  “हं,  तू आजचं निघ,  विनिता वहिनींची तब्बेत बरी नाही. पंधरा दिवस झोपून आहेत.” छोटू काका बोलले.  “काय?  पंधरा दिवस झोपून आहे?” रश्मी चिंतीत होऊन बोलली.  ” मी इथे कांदे – पोहेचा कार्यक्रम करतं बसलेय” रश्मी  स्वगत  बोलली.  “अशा वेळी असा कार्यक्रम का ठेवला सर्वांनी?” रश्मीने काकांना विचारलं.  “विनिता वहिनींना भेटलो आणि त्यांनीचं ठरवलं कार्यक्रमाचे.” काका उतरले. “सॉरी काका” म्हणून बॅग घेऊन रश्मी पायऱ्या उतरली आणि रिक्षात बसली.  “सेंट्रल बस स्टँडला घ्या रिक्षा.” रश्मीने रिक्षावाल्याला डेस्टिनेशन सांगितलं.  लाल पिवळया रंगांच्या खुप साऱ्या गाड्याची ये –  जा  चालू होती. कन्नड अक्षरांत गावाचं नाव लिहिलेली पाटी दिसली. “तब्बल, सव्वा वर्षानंतर गावी जातोय आपण. “गावची आणि आईच्या भेटीची ओढ लागून राहिली.  आता गाडीचं,  थोडंसं पण लेट होणं, असहनीय वाटतं होतं. गेले पंधरा दिवस  झोपून आहे आई.  किती त्रास होतं असेल तिला.  सईला कॉलेज आणि घर सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत असेलं.  तिला आईची काळजी घेता येत असेल ना?  गाडीनं मद्यवर्ती बसस्थानक सोडलं तेव्हा, बर वाटलं रश्मीला.  मनानं केव्हाच घरी पोहोचली होती रश्मी. 

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More