आत्ता पर्यंत आपण वाचलात,
भाग -1* एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते ……. भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण…. भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…. भाग – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत कुसुम ताई, सई, चंदाच्या बालपणातील आठवणी…. भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते, निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏. भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीच वि….. सदृश्य जीवन. भाग -7 * एक सक्षम महिला असून पण, रश्मीनं गप्प राहून का सहन केला अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना? अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी… भाग- 8* आईचं, मानसं दर्शन,
राजेशची प्रकर्षाने आठवण आली. भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीच काय होणार? भाग – 10* साखळीचा खेळ,@ मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, @ गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. @ पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11* मालिनी वाहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12* सुचिताचि प्रश्नावली, श्री आणि विनिता घराचं घरपण कस टिकवतात? रश्मी झोपेत का घाबरली ? दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?
भाग -13* @रश्मी खोटं बोलते पण…? @ चंदा कुठे राहिली? @ चंद्र्याला पाटलीण बाई चप्पलन का मारते?
भाग -14 * काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी? काका आजोबाचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरना का भेटली? सर नी पेढे का मागितले?
भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश, सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी पुतळी लायब्ररीत का बसत?
भाग-16 * विनिताला कसली काळजी होती? काय उपाय मिळाला शेवटी? का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी? शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीन? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?
भाग- 17 @ दिवाळी म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले? 🙏🌹
दिवाळी विचार , दिवाळी चाहूल
हसत, खिदळत बाहेर पडलेल्या तिघींना, बाय करत काका, काकू आणि भावंड खुशीत वाड्यात परत आली खरी. मुलींच्या चिवचिवाटामुळे भरलेळ्ं घर त्या निघून गेल्यामुळे एकदम शांत शांत झालं होतं.
इकडे एकदम खुश होऊन तिघींनी परतीच्या वाटेनं एस् . टी. स्टँड गाठलं.
गावातल्या गंमती, काका, काकूंची भेट, त्यांच्याशी मारलेल्या गप्पा सांगत आणि इतर गप्पा गोष्टी बोलत सर्व जणं एकदम खुश होते. दिवाळीचा पहिला दिवस उद्या…. दिन, दिन दिवाळी म्हणता, म्हणता दिवाळी आली. “चला, उद्या पहाटे उठायचं आहे, आता झोपी जा लवकर”, म्हणत नाईट लॅम्प लावला विनितानं तशा तिघीं बहीणी झोपी गेल्या. तालुक्यामध्ये दिवाळीची रोषणाई अफलातून वाटली सर्वांना. रंगीबेरंगी लाईटस् च्या माळा, वेगवेगळ्या रंगांचे कंदील, वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या पणत्या…. डोळ्यांना सुखावत होत्या. इलेक्ट्रिक लाईटस् च्या माळा असोत किंवा आकाश कंदील, निरांजन, समई असो किंवा पणतीमधील ज्योत उद्देश एकच, ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ खरंच सर्वांचं जीवन उजळून निघू दे. प्रकाशामुळे अंधार नष्ट होतो तसं ज्ञानामुळे अज्ञान नष्ट होऊदे. अज्ञान नाहीस झालं की माणसाला बऱ्याच गोष्टी समजतात, विचार करण्याची कुवत येते. माणसाच्या मनात जिज्ञासा जागृत झाली की कार्यकारण भाव शोधतो. जीवनात विज्ञानदृष्टी अंगीकारली तर प्रत्येक गोष्ट पडताळून पाहू शाकतो. आपल्या संस्कृतीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना विज्ञानांचा पाया आहे. पण कालौघात त्याच्या पाठच विज्ञान मागे राहील आणि फक्त अंधश्रद्धेनं त्याचं पालन केला जातंय. पण हल्लीची पिढी अशी आहे की, कोणतीही गोष्टी करताना त्या पाठीमागचं कारण समजल्याशिवाय आचरणात आणायला तयार नसते. मग आपल्या चांगल्या गोष्टी सोडून, बाहेरच्या लोकांच अनुकरण केलं जातं. म्हणून शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन दोन्ही मध्ये तेवढीच रुची हवी. निसर्ग रीती, देवाची भीती आणि समाज निती अशा क्षेत्रात धर्माची चलती असते. 🙏 म्हणून ज्ञानाची आस आणि विज्ञानाची कास पकडून पुढे जाण्यास प्रवृत्त व्हायला हवं. कोणत्या गोष्टी केल्या तर काय परिणाम होतो? चांगला परिणाम होण्यासाठी नेमकं काय करावं ते समजत. म्हणजेच अविचाराने कोणतंही पाऊल उचललं जाणार नाही. मुलाना शिक्षण देणं, चांगले संस्कार देणं, चांगल्या विचारांची सवय लावणे आई म्हणून आपल्या हातात आहे. “मला जसं वाटतं आपल्या मुलींचं भविष्य स्वतः लिहावं”, ही गोष्ट आपल्या हातात असती तर? कदाचित प्रत्येक आईला तसचं वाटत असेल पण ते शक्य नाही. म्हणून प्रत्येक आई आपल्या मुलासाठी, त्याच्या उज्वल भविष्यासाठी सतत झटत असते, चांगलं चिंतत असते, मेहनतीचं महत्त्व सांगत असते जेणेकरून आयुष्यात आपल्या मुलांनी यशस्वी व्हावं. तिला माहीत असतं यशाला शॉर्टकट नाही. मेहनती मधून मिळालेल्या यशाला तोड नाही. त्या सारखं दुसर सुख नाही.
जल धारांनी धुवूंनी रस्ते,
झाडे, वेली मस्त डोलती,
भरल्या विहिरी, तलाव अन्
सरी देऊनी निघते वर्षा
पुनश्च आगमन पुढच्या वर्षी ||१||
बांधून तोरण दरावरती,
तुरे खोवूनी फेट्या वरती,
म्हणतो सारे एक सुरात ..
“दसरा हा सण मोठा,
नाही आनंदाला तोटा” ||2 ||
ताव मारतो पक्वन्नावर,
पुरण पोळी, श्रीखंड पुरी,
एक दिन अन नऊ अप्सरा,
आल्या पावली निघतो दसरा,
दीपावलीची देऊन चाहूल ||3||
आशा या वर्षभर वाट पाहायला लावणाऱ्या दिवाळीचं आगमन उद्यावर येऊन ठेपलं..
विनिता स्वतःच्या हातानं बनवलेल्या पदार्थांची चव न्यारी. तीनं बनवलेली चकली, करंजी, शंकरपाळी, लाडू, चिवडा चिरोटे सारे पदार्थ स्वादिष्ट. खाणारा तृप्त आणि खुश होऊन जाई.
पहाटे अभ्यंग स्नान करण्याची वेळ झाली म्हणून फटाके वाजू लागले एक,दोन, तीन, आणि 💫💫⚡✨💫💫💥⚡💥💥💥💥
दिवाळी शब्दात दीप आहे, प्रकाश आहे, गोडवा आहे, गीत आहे, शब्दात फराळ आहे, अभ्यंग स्नान, नवीन कपड्यांचा वास अन् नातेवाईक, मित्रपरिवार भेटीची आस, शब्दात फटाके, भुईचक्र आणि फुलबाज्या, लक्ष्मीपूजा, झेंडूच तोरण, गोपूजा, पाडवा, बीज, निसर्गाचं सुंदर रूप म्हणजे, गोड थंडी, लाईटच तोरण, अत्तर, परफ्यूमचा सुवास आहे. ओवाळणीचं ताट घेऊन आई, बहीण, अर्धांगी सर्व नारी जमात सजून, सवरून तयार आहे. कडाक्याच्या थंडीत सुवासिक तेल, मोती साबणाचा वास अन् गरम वाफाळलेल्या पाण्यानं केलेल्या स्नानाची मजा काही औरच. दिवाळी तना, मनात भिनते. चेहऱ्यावरील भावातून उतरते ❗️ कुणी म्हणतं “दिवाळी नव्हे, दिवाळं निघत”, पण या साऱ्याशी काही देणं घेणं नाही. वर्षातून येणाऱ्या सणातून आनंदच वाटला जातो.
वसुबारसची करून पूजा, आनंदी राही शेतकरी राजा,
धन्वन्तरीला पुजून आरोग्य संपन्न, हवे कुटुंबिय अन् मित्र परिवार |
नरकासुरास मारुनी, विजयी,
चतुर्दशीला करिती प्रारंभ सडा संमर्जन, रांगोळीने,
दीपमाला, दारीं तोरण आगमन अन् लक्ष्मीपूजन 🌷🌟🙏|| 2||
भाऊबीजेला आशिष घेऊन बहीण जाते परत सासरी …
पुन्हा पुन्हा गोड आठवणी वर्षाकाठी एकच दिवाळी ||3||
असे काय हे निसर्ग नियमन ? रोज दिवाळी का नच येती?
गम्मत असावी पुरे वर्षभर, दिवाळी असावी पूर्ण वर्षभर||3||
आनंदात, खुशीत अतिशय वेगळ्या वातावरणात दिवाळी मस्त साजरी झाली. प्रोफेसर दास, कुसुम ताई, कुलकर्णी फॅमिली, जोशी आणि बिट्ट्ये, भस्मे कुटूंबीय दिवाळीत भेटून गेले. मैत्रिणी आल्या. शुभेच्छा भेटी झाल्या आणि दिवाळी पुढील वर्षी परत येण्यासाठी खुप सारा आनंद आणि ख़ुशी देऊन गेली. 🙏
रश्मी स्वप्नात रडत का होती 😭?
तिघी मुली आपल्या अभ्यासाकडे वळल्या. आता दिवसाचा दिवस आणि रात्रीचा पण दिवस झाला. थोडया वेळेकरीता झोप लागली तरी परीक्षेची स्वप्न पडू लागली.
सराव प्रश्न सोडवताना त्याची काठिण्य पातळी जाणवू लागली. रात्रभर दिवा जळू लागला. दुसरं सत्र सुरु झालं
सर्व मुलं फ्रेश मूडन कॉलेजला जाऊ लागली आणि सर्वांच्या तोंडात बोर्ड परीक्षेचा विषय चर्चेला येऊ लागला.
“अरे बापरे! मला परीक्षा हॉल मध्ये पोहोचायला खुप उशीर झाला. मला इतकी गाढ झोप, कशी काय लागली?” स्वतःशीच पुटपुटली रश्मी. ” सर, पहाटेपर्यंत अभ्यास करत होते. मला समजलच नाही, साडे अकरा कधी झाले ते. झोपेतुन जागी झाल्या वर लगेच तयार होऊन पोहोचले. सर, परीक्षा देऊ द्या ना सर. प्लिज, सर प्लिज…… माझं वर्ष फुकट जाईल सर”. आणि जोरात हुंदका बाहेर पडला आणि गदगदून रडत राहिली,
” रश्मी sss, ए रश्मी उठ, रडतेस का?
रश्मी sss”, आईचा आवाज कॉलेजच्या परिक्षा हॉल जवळ कसा काय?
“रश्मी ssss” विनितानं जोरात आवाज दिला. हात लावून विनिता जोरजोरात हालवत होती रश्मीला. डोळे उघडले रश्मीने तर समोर आई होती.
“काय झालं, सर प्लिज परीक्षा देऊ द्या.. म्हणून रडत का होतीस? घामाघूम झालीस” विनितान विचारलं. आता, अर्ध्या तासापूर्वी झोपलीस. काय हे? स्वप्नात घाबरलीस का ?
नेमकं काय झालं हे समजायला वेळ लागला रश्मीला. सुटकेचा नि:श्वास सोडला तीन. “परीक्षेला उशिरा पोहोचल्यामुळे हॉलमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून स्वप्नात रडत होते.”रश्मीन आईला सांगितलं
आज कॉलेज सुरु होऊन दहा दिवस झाले. दिवाळी सुट्टीत साऱ्या गोष्टी विसरून फ्रेश मूडन कॉलेजला जायला तर लागली रश्मी पण लक्षात आलं की कॉलेजच्या रस्त्यावर सतत कोणीतरी पाठी आहे. सुरुवातीला तीनं दुर्लक्ष केलं पण नंतर बाईकची संख्या वाढलेली दिसली. शेवटी वळणावर थांबून रागानं व्यक्त झाली.. “कुत्र्यासारखं पाठीपाठी काय येताय माझ्या? थू ssss ” थुंकली त्या झुंडीकडे पाहून आणि रागारागात निघून गेली कॉलेजला. अंग थरथरत होतं तिचं. पण हलकं वाटलं थोडं. निषेध केला. नाराजी दाखवली. रोज घरातून कॉलेजला जाताना आणि कॉलेजमधून घरी जाताना पाठी पाठी बाईक्सचीं झुंड. ताण सहन नाही झाला तिला. झुंड टोळीला अजिबात फरक पडला नाही निषेधाचा. परत घरी जाताना तिचं अवस्था. आता बाईकसची संख्या वाढली आणि एकदम जवळून कट मारला आणि काहीतरी बडबडला तो. परंतु बाईकच्या आवाजात नेमकं काय बोलला समजलं नाही रश्मीला. त्याची नजर घृणास्पद होती आणि तोंड पान खाऊन लाल झालेलं दिसलं. हिडीस प्रसंग होता तो. घरी गेल्या गेल्या आईला सारा प्रकार सांगितला रश्मीने.
बारावीच वर्ष, नवीन जागा, नवीन माणसं, तरुण मुलगी, आता अभ्यासाबरोबर आणखी एक काळजी. विनिताला सुचेना काय करू, स्वतः जाऊन त्या माणसांना जवाब विचारावा का? पण त्यानं काय होईल? एवढी समजूतदार असतील का ते अनोळखी लोक? रश्मी हल्ली घाबरलेली वाटते पण तसं बोलत नाही. विनिता ताबडतोब कुसुमताईला जाऊन भेटली. आता सध्या जवळची, काळजी वाहू आणि हितचिंतक कुसुमताईचं आहे. ताईनं जेव्हा सारी हकीकत ऐकली तेव्हा पहिल्यांदा डोक्यावर हात मारून घेतला. तेवढयात तिथं ताईचा मुलगा, चिंटू आला कॉलेजवरून. “काकू कशा आहात? सारं ठीक आहे ना? तुम्ही काळजीत दिसतात”? चिंटून काकूंच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून, काळजीने विचारलं. तस चींटुला जवळ बोलावून कुसुमताईन हळू आवाजात कानात काहीतरी सांगितलं. त्यानं एक कटाक्ष टाकला विनिता काकुंवर आणि ठीक आहे म्हणून निघून गेला बाहेर. “ठीक आहे विनी, काळजी करू नको. जा घरी, आणि रश्मीला सांग अशा लोकांना अजिबात काही प्रश्न नाही विचारायचा, ना त्यांना महत्व द्यायाच. खाली मान घालून कॉलेजला जायचं आणि तसचं परत घरी यायचं”. “उद्या भेट पुन्हा” म्हणून निरोप घेतला कुसुमताईनं. जड पावलांनी विनिता घरी आली.
“आई, मी ट्युशनला जाते”, म्हणून रश्मी बाहेर पडली
आता काळजीची जागा भीती घेतेय का? असं वाटायला लागलं. बाहेरून परत रश्मी घरी येईपर्यंत विनिता अस्वथ असे. पण चेहऱ्यावर अजिबात काळजी, भीतीचा लवलेश दाखवत नसे विनिता. त्यामुळे बाहेर जाताना रश्मीला अजीबात भीती वाटत नव्हती.
सर, आणि कुसुमताई काय बोलत होते?
रविवारी रश्मीचे सर आणि मामी आल्या घरी. सरांच्या मिसेसना आम्ही सर्व मुली मामी म्हणत असू. तालुक्यामध्ये खरेदीचं कामं काढलं होतं त्यांनी. सर आणि मामी म्हणजे कुटुंबाचाच भाग होते. “काय रश्मी, तुझं कॉलेज कसं सुरु आहे? नवीन जागा, सांभाळून राहायला हवं. मैत्रिणी कोण आहेत तुझ्या? आणि अभ्यास कसा चालू आहे?” सर प्रश्नावर प्रश्न विचारत होते आणि रश्मी काहीच बोलत नव्हती. गंभीर चेहऱ्याने तीनं एकदा विनिताकडे पाहिलं आणि एकदा सर आणि मामींकडे पाहिलं…. तेव्हड्यात, “विनिताsss , ए विनिताsss … ” कुसुमताईचा आवाज आला. या कुसुम काकू” म्हणून रश्मीने काकूंना, सरना आणि मामींना नमस्कार केला. कुसुमताईंनी रश्मीला, चहा कर म्हणून आत पाठवल आणि चौघेजण, सर, मामी, आई आणि कुसुमताई बराच वेळ बाहेरचा आणि किचनचा दोन्ही दरवाजे बंद करून बोलत होते.
“विनी, तू नको ठेऊस इथं रश्मीला. ताबडतोब हलव तिला. ते लोक नीच आहेत, पोरीबाळींना नासवतात. रांडीचे,” ताई संतापानं लाल झाली होती. सर, मामी समजून चुकले विनिता आणि रश्मी कोणत्या परिस्थितून जात आहेत. मामींनी आणि ताईनं आईचा हात पकडून तिला धीर देत होते. विनिताला खरंच गरज होती अशा माणसांची आणि आधाराची. दरवाज्यावर टक टक करून रश्मी, पाणी चहा आणि चिवडा घेऊन आली बाहेर. तो पर्यंत जरा सावरताना दिसले सगळे. “रश्मी बैस इथं”, सर बोलले. “गाव सोडताना, तुला सांगितलं होतं, अनोळखी लोकांपासून सावध रहा म्हणून. कॉलेज मध्ये, मैत्रिणींचा ग्रुप बघून मैत्री कर म्हणून स्पष्ट बोललॊ होतो. कोणत्याही मैत्रीणीला घरी कशी घेऊन येतेस? बघ तुझ्या आईकडे कशी अवस्था झालेय त्यांची. तू मोठी ना घरात? सर्वाना तू सांभाळून घेणार की सार्वजण तुला सांभाळणार?” सर समजावण्याच्या सुरात बोलले
मामींनी ‘कटाक्ष’ टाकला पण बरंच काही बोलून गेली त्यांची नजर.
“उद्या, परवा सुट्टी आहे. अजिबात घराबाहेर पडायचं नाही.” कुसुम काकू बोलल्या.
“तुझी बॅग भरून ठेव. मंगळवारी केदार काका येतील. त्यांच्या बरोबर छोटू काकांकडे जायचं. मी बोलतो त्यांच्याशी.” सरांनी सांगितलं.
“तिथं घरी बसून अभ्यास कर. फक्त परीक्षेकरता यायचं इथं”, आई बोलली.
रश्मीकडं बोलण्यासारखं काही नव्हतच.
” रश्मी, ही शांती कोण? कुठं राहते?” मामींनी विचारलं
रश्मी तोंड उघडणार इतक्यात, मामी स्वतःच पुटपुटल्या,
“पण आता विचारून काय उपयोग…? ”
“हे सारं काय होतं” हे समजण्याइतपत मोठी नक्कीच होती रश्मी.
चिंटू, कुसुम ताईंच्या मुलग्याने जी काही माहिती सांगितली ते ऐकून स्वतः धावत आल्या ताई. त्यांना राहवलं नाही.
“बुधुवारी, कॉलेज सुटल्यावर, रश्मी पुन्हा दिसणार नव्हती. तीनं थुंकून, “कुत्रासारखं पाठी पाठी का येताय? असं विचारण्याचं धाडस केलं कसं? याच उत्तर म्हूणन तिला नाहीस करण्याचं ठरवलं होतं टोळीनं.” आता कुसुमताई रश्मीच्या तोंडावर सर्वांसमोर स्पष्टपणे बोलल्या.
रश्मी स्वतःला कठपुतली का म्हणते?
काही वेळ निशब्द शांतता होती घरात. रश्मीला समजत नव्हतं तिचं काय चुकलं. पण तिला रडावं नाही वाटलं त्या क्षणी.
मंगळवारी सकाळी सात वाजता, केदारकाका दारात उभे होते. ते आत आले आणि पाठी खोवलेला विळा दाखवला विनिताला.
केदार काका म्हणाले, “रश्मी अक्काद काळजी माड ब्याडरी. नंद ज्योती आवर सुरक्षित अदार”. बॅग उचलली केदार काकांनी आणि, “नडी री, रश्मी अक्का गोळरी”, म्हणाले. एका कठपुतळीप्रमाणे मी, उंबरा ओलांडला आणि केदार काकांमागे चालू लागले.”
वास्तविक पाहता आईनं एका शब्दानं झाल्या घटनेबद्द्ल रश्मीला जबाबदार धरलं नव्हतं. ना कोणी रागावलं. रश्मीवर हात उगारायचा, मारायचा प्रश्नच नव्हता. तरी रश्मी घराबाहेर पडल्यापासून रडत होती. सकाळी निघाली तेव्हा, कॉलेज रस्त्यावर सामसूम होती बाजूच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानावर तिरपी नजर टाकली. दुकानाचं शटर बंद होतं. तिला आठवलं, पाहिल्यांदा सायकल शिकण्यासाठी तिथूनच भाड्याने आणली होती सायकल. उमेश दादाला हट्टाने सायकल शिकवायला सांगून कॉलेज ग्राऊन्ड्वर नेलं होतं आपण. तालुक्याच्या गावी पाण्याची समस्या होती. दूर पी. डब्लू. डी. ऑफिसजवळून एकावेळी सायकलवरून चार, सहा घागरी पाणी आणता यायचं. अन्यथा प्रत्येक घागरीसाठी दोन रुपये द्यावे लागायचे. मळ्यात मुबलक प्रमाणात पाणी वापरण्याची सवय असलेल्या रश्मीला पाणी विकत घेणं विचित्र वाटायचं. आणि, म्हणून सायकल भाड्याने घेऊन जात होतो आणि पाणी भरत होतो आपण.
सायकल दुरुस्तीचा दुकानदार, वयांन मोठा मनुष्य, दोन मुलांचा बाप आहे तो. आपल्याबद्दल इतका वाईट विचार होता त्याच्या मनात? हा विचार सुद्धा घृणास्पद वाटला रश्मीला.
मानवी मनाचा थांग आपल्याला लागला नाही, ओळखता आला नाही स्वभाव. अंदाज तर नाहीच आला.
केव्हा नजर उचलून पाहिलं नाही. “भाईसाब दो घंटो के लिये साईकल चाहिये |”. आणि “ये लो पैसा |”. या दोन वाक्या व्यतिरिक्त, सात महिन्यात तिसरं वाक्य बोललो नाही आपण सायकल दुकानदाराशी. ना डोळ्यांच्या पापण्या उचलून पाहिलं समोरच्या व्यक्तीकडे. किंबहुना त्याची गरज वाटली नव्हती.
घरातून बाहेर पडल्यापासून, डोळ्यातून धारा सुरु झाल्या अविरतपणे दोन, तीन तास. केदार काका हैराण होऊन फक्त पाहत होते….. रश्मी अक्का गोळरी, आळ ब्याडरी” समजुतीच्या स्वरात बोलले. “अक्का, उर बंत री, नडी री” म्हणून बॅग उचलली. काही वेळात काकांच्या दारात उभी होते. “ये रश्मी, आत ये”, काका, काकूंनी प्रेमानं स्वागत केलं. बरेच दिवस झाले तरी, डोक्यात फक्त बाईकचे आवाज घुमत होते. मध्यरात्री दचकून ओरडत उठल्यामुळं काकू हैराण झाल्या. काका, काकू रश्मीची समजूत घालून झोपी जात. “मोगलाई आहे का? केवढी घाबरतेस? इथं कोणी येणार नाही. निर्धास्त रहा. परीक्षेची तयारी कर.” काका म्हणायचे.
काकू सर्व कामं स्वतः करायच्या. काका नोकरीसाठी बाहेरगावी जायचे आणि उशिरा परत यायचे. मळ्यात मे महिन्याच्या आणि दिवाळी सुटीत काका, काकू घरी यायचे. सई, चंदा त्यांच्याकडून लाड करून घेत होत्या. आबांचं श्राद्ध छोटू काका करायचे. तेव्हापण रश्मी काकांच्या गावी यायची. पण आता समजतंय आपण मनानं त्यांच्याजवळ गेलोच नव्हतो कधी, की आपण, आपल्याच विचारात असतो म्हणून वाटतय असं? रश्मीच्या मनात प्रश्नांचे तरंग उठले. पण काकू खुप आपुलकीने आणि प्रेमानं करत सारं.
रश्मी, काका आणि काकू कोठे गेले?
गुरुवारी सकाळी काकूंनी पटापट स्वयंपाक आवरला. “रश्मी, तयार हो आपण वाडीला जाऊ”, काका म्हणाले.
“काका, आज तुम्हाला सुट्टी? रश्मीने किंचित हसत पृच्छा केली.
“रजेचा अर्ज पाठवतो, म्हात्रे गुरुजींबरोबर”, काका उतरले.
काका, काकू, रश्मी टांग्यात बसून निघाले. डांबरी रस्त्यावर घोड्याच्या टापांचा आवाज, स्वच्छ आकाश, एका बाजूला दूर नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी आणि दुसऱ्या बाजूला हिरवी ऊस शेती…. आपोआप रश्मीचा चेहरा खुलला.
“रश्मीसाहेब, आम्ही, तुझा काका आणि काकू तुझ्याबरोबर आहोत. भक्कम पणे उभे आहोत आम्ही तुझ्या पाठीशी. घाबरून रात्री किती जोरात ओरडलीस? आता मोकळ्या हवेत बाहेर पडल्यावर तुला बरं वाटेल.” काका बोलले. काका पूर्वीपासूनचं रश्मीला साहेब म्हणून हाक मारत असतं.
“तुझ्या काकू साहेबांची आयडिया आहे. आज तूझ्याबरोबर वाडीला जायची. तुला बरं वाटेल थोडं बाहेर फिरून आलं की, म्हणून आज वाडीला जायचं ठरवलं. तू पुस्तकं वगैरे वाचतेस ना? सर्व विषयाच्या नोट्स आहेत ना तुझ्याकडे? मग अभ्यासं करताना मध्येच कसला विचार करतेस? बोर्डाची परीक्षा जवळ आलीय. असा अभ्यास करून देणार आहेस परिक्षा ?” काकांनी विचारलं.
“काका, मला माहीत आहे, माझ्या हातात पुस्तकं असतं पण डोक्यातल्या विचारांमुळे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होतं नाही” रश्मी उतरली. आता टांगा पुलाच्या दिशेने वळला, आणि
जोरजोरात बाईक्सचा आवाज आला. न कळंतपणे रश्मीनं, काकूंचा हात हातात घेऊन घट्ट पकडून ठेवला. काकूंनी आपला एक हात रश्मीच्या खांद्यावर ठेवला केवढा आधार वाटला काकूंच्या खांद्यावर ठेवलेल्या हातामुळे. काकूंना रश्मीचा हात, कंप पाऊन नंतर थंड झाल्याचं जाणवलं. रश्मीचा हसरा चेहरा एकदम गंभीर झाला होता. टांगेवाल्याने जोरात आलेल्या बाइक्सना पुढे जाण्यासाठी वाट दिली.
“आज गुरुवार, जवळपासच्या गावचे लोक दत्त दर्शनासाठी येतात.” काकू बोलल्या.
नॉर्मल वाटल रश्मीला स्वतःला, कृष्णा नदीचं वाहत पात्र पाहून. मस्त वारा वाहत होता. वाऱ्यामुळं वाहत्या पाण्यावर लाटा दिसत होत्या. संत वाहत होती नदी. आता पुलावरून टांगा पुढे आला होता. परत दोन्ही बाजूला ऊस शेती होती. गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा करणारी उंच टाकी दिसत होती. टांग्यांन वळण घेतलं आणि एस. टी. स्टॅन्ड च्या बाजूला इतर टांगेवाल्यांच्याबरोबर उभा केला. दत्त गुरूंच्या पवित्र स्थानी पोहोचलो होतो. एकदम हलकं, स्वस्थ आणि मोकळं वाटलं. काकू, लहान मुलांचा हात पकडतात तसा रश्मीचा हात पकडून मंदिराच्या दिशेने निघाल्या. काकानी कमानी जवळच्या दुकानातून नारळ, कपूर, अगरबत्ती, पेढे घेतले. उंच उंच पायऱ्या उतरून कृष्णा नदीच्या पाण्यात पाय धुतले, डोळ्याला पाणी लावून, “ओम श्री गुरुदेव दत्त” चा घोष झाला. एक एक पायरी चढून वर आलो आम्ही तिघे. 11- 45 झाले होते. “दत्त पादुकांचे अनावृत्त दर्शन” आम्ही तिघेही डोळ्यात साठवून घेत होतो.
पाण्याचा अभषेक, दूध, मद, दही, तूप काळ्या पाषाणाच्या पादुकांवर एक एक करून हळुवारपणे धार धरून वाहत होते. बाजूचे ब्राह्मण मंत्रघोष करत होते. पंचामृत स्नान झालं. स्वच्छ धूत वस्त्राने पादुका कोरड्या केल्या. दोन पादुकांच्यामध्ये कपडा ठेऊन ओलावा टिपून घेतला. उगाळलेलं चंदन लेपन केलं, कुंकू उठून दिसत होत चंदन लेपावर. विशिष्ट पद्धतीने रंगीत, सुवासिक फुलं ठेवली पादुकांवर. लाल वस्त्रावर विड्याच्या पानाचा आरास असलेली त्रिमूर्ती ठेवली. “ओम श्री गुरुदेव दत्त” सर्व पुजारी ब्राह्मणांनी एकत्र जयघोष केला. काही लोकांच्या महापूजा चालू होती दोन्ही बाजूच्या मंदिर द्वारावर. दत्तमय होत सर्व मंदिर, मंदिरातील भक्त, आजूबाजूच परिसर. निर्भय, निरामय वातावरण. सर्वजण आरतीला उभे राहिले.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा,
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा,
नेती नेती शब्द न ये अनुमाना…
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
………………………………
प्रदक्षिणा घालून, सकारात्मक ऊर्जा घेऊन नव्या उत्सहात रश्मी, काका, काकूं बरोबर मंदिरातून बाहेर आली. मनोमन काका, काकूंना धन्यवाद देत. त्यांच्यामुळं दर्शन झालं दत्त पादुकांचे 🙏🌺🌺🌻🌷
पेढ्याच्या दुकानाजवळून जात असताना,
“गुरुजी ssss”
“रश्मी sss ” पाठीमागून आवाज आला.
आवाजात आनंद, ख़ुशी आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली. आवाजाच्या दिशेने पाहिलं रश्मीने आणि तोंडभर हसून उच्चारली, “तुम्ही…” आणि धावली..
6 Responses
खूपच सुंदर शब्द चित्र .
आपण व्यक्त केलेले अभिप्राय मला पुढील साहित्य लिखाणास प्रेरणादायी आहेत. 🙏🌺
नरसोबाच्या वाडीला टांग्यात बसून वाडीला जाणाऱ्या रश्मीचे हुबेहुब शब्दचित्र रेखाटले आहे . मनःच क्षुनी दत्तगुरूंचे पुजन पाहिले आत्मा तृप्त झाला🙏
आपल्याला दत्त गुरूंचे आशीर्वाद लाभोत. सुखी भवः
सुंदर वाक्य रचना प्रत्येक वाक्य स्मृती पटलावरील स्मृती उमलवून प्रत्येक अक्षरात आपसूक घरंगळत येणाऱ्या मोत्याच्या माळेतील मोतीच !
नंदा तू दिलेले प्रोत्साहनपर अभिप्राया बद्दल धन्यवाद. 🙏🌷