भाग -1* एक आई , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते …….
भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण….
भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….
भाग – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत कुसुम ताई, सई, चंदाच्या बालपणातिल आठवणी….
- भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते:निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.
भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचं वि….. सदृश्य जीवन.
भाग -7 * एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार ? अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना. अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग- 8* विनिताआईचं, मानस दर्शन,
राजेशची प्रकर्षाने आठवण आली.
भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार?
भाग – 10* साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11* मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.
भाग- 12* मध्ये वाचा, सुचिताचि प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कस टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?
भाग -13* @रश्मी खोटं बोलते पण…? @ चंदा कुठे राहिली? @ चांद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारतात?
भाग -14 * वाचा काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी? काका आजोबाचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरना का भेटली? पेढे कोणी मागितले? भाग -15@ वेगळा विचार, @ मन कप्प्यात बंद गोष्टी, @ पण ते इतक सोपं होतं कां?, @रश्मी बद्दल प्रश्न?, @ कॉलेज प्रवेश, @ सरुताईचा सल्ला, @ रश्मी मॅडमना पाहून गप्प कां झाली?, @ विनिताचा चेहरा कां काळवंडला?, @ रश्मी, पुतळी लायब्ररीत कां बसत?
वेगळा विचार
जीवन वाटेवर आलेल्या काट्यांनां ,
गुलाब आणि कळ्या लगडल्या ||
बोथट झाली काट्यांची धार,
अन जीवन वाट झाली सुकर ||
थोड्याश्या हिरवळीने मना, तनास
उत्साह नव कार्यास्तव वाढे
दिलासा खुप सारा
रस्ता चालण्यास पुढे पुढे, ||
सिहांवलोकन चाललेल्या वाटेच🐅
अंदाज पुढे जाणाऱ्या रस्त्याचा…🦶🦶
की रस्त्यावरून जाणाऱ्या
नवख्या वाटसरूचा ||
रस्ता कुठेच जात नाही तरी पण
म्हणतो, “रस्ता संपत नाही”
चालणारा जो पर्यंत नाही थांबत,
वाट देत राहतो रस्ता, वाटसरूला, ||
चालत रहा ध्येयाप्रति, ध्येयासाठी
ध्येय वेड्या स्वप्नपूर्तीस्तव ||
असाद्य ते साद्य करिता सायास
जीवन प्रवास यश देई 👣👣👣 🎉
काळ जात होता, ओरखडे, जखमा भरत नव्हत्या, किंबहुना त्या बऱ्या होणार नव्हत्याच मुळी . पण ओंजळीत अपेक्षित टाकत होता तो “दाता”. स्वतः एखादी गोष्ट करण्ं आणि दुसऱ्या कडून करवून घेणं यात फरक आहे. विनिताला दोन्ही गोष्टी जमत होत्या. तिला पूर्ण कल्पना होती, ती कोणतं पाऊल उचलतेय ते. त्याची सर्वस्वी जबादारी तीनं स्वतःवर घेतली. परिणामाचा बाऊ न करता, अवडंबर न माजवता. लागली कामाला विनिता त्या मध्ये असलेले धोके गृहीत धरुन. तीनं आतापर्यंत सर्वांसमोर आपल्या मुलींच्या कमीपणावर बोटं ठेवलं नाही, ना त्याच्या क्षमता तपासल्या. तिला स्वतःच्या कर्तृत्वाला मर्यादा माहित नव्हत्या. अफाट, अमर्याद स्वातंत्र्य दिल्यावर आणि पूर्ण विश्वास असल्यावरच चांगल्या गोष्टी घडू शकतील असं तर तिला वाटत नसेल?
रश्मी, चंदा आणि सई राखतील का स्वातंत्र्यदातीचा मान? काय दडलंय भविष्यात? ना नाडकर्णी, ना कुलकर्णी, ना पंडीत, ना पेशवे, ना जोशी, ना देशपांडे कोणीच एवढे स्वातंत्र्य, मोकळीक आणि उच्च शिक्षण नव्हतं दिलं मुलींना अगदी आतापार्यंत.
हायस्कुलचं शिक्षण संपलं की, कॉलेजला न जाणारी बरीच मुलं दूध वाटपाचं काम, किंवा पारंपारिक कामधंदा करत असत. मुली शिलाईचा कोर्स करून शिलाईमशीन घेत अथवा लग्न करून सासरी जातं.
त्या मुळं विनिताचा वेगळा विचार,
धडाडीचा निर्णय, धाडसी पाऊल, लक्ष्य समोर ठेऊन करत असलेलं कर्म सर्वापेक्षा वेगळं होतं. दीर, जाऊ, हितचिंतक, मैत्रिणी सर्वांनी धोक्याची सूचना दिली. धोक्याबध्दल बोलायचं तर कुठं नव्हता तो? आपलं ध्येय निश्चित करून त्यावरून सावधपणे वाटचाल करणं आपल्या हातातं. प्रयत्न्य करणाऱ्याला ईश्वर पण साथ देतो. “असेल हरी तर देईल खाटल्यावरी” म्हणून गप्प बसून राहणारी नव्हती विनिता. ना “तुझा मुलगा चक्रवर्ती होईल” असं भविष्य ऐकून आपल्या मुलाला निक्कमा बनवणाऱ्या आई सारखी निष्क्रिय होती.
सर्व जणांचा विरोध पत्करून.. केलेलं धाडस होतं. हेतू शुद्ध आणि स्पष्ट होता.. पण पाऊल उचलण कठीण… पण उचलल पाऊल विनितान…. आणि मळा विकायचा निर्णय घेतला. दुसरा पर्याय नव्हता तिच्या कडे…
मन – कप्प्यात बंद गोष्टी…
फुलांनी लगडलेली वेली अन झाडं🥀🌷🏬🌺🥀, दाराची अन वृन्दावनाची शोभा वाढवणारा आणि सुगंधी सडा टाकणारा प्रजक्त, प्रत्येक वर्षी लग्न लावलं जाणारी तुलसी वृन्दावनातली तुळस, आंब्यांच्या फळांनी लगडलेला बहारदार वृक्ष, वर्षातून शेकडो चिक्कू अंगा खांद्यावर मिरवणारा चिक्कू वृक्ष, आकाशाला गवसणी घालणारे पपईचे झाडं, आकाश माझी मर्यादा म्हणत वाढणारे श्रीफ़ळाचे शत वृक्ष, सीताफळ, रामफळ, केळी दिसणार नव्हते. “वाहिनी साब, मिरचीचं पहिलं रोप तुम्ही लावा जी” “मुहूर्ताची उसाची पहिल्या कांडीची लावणी तुम्ही करा, रश्मी अक्का” “भाताची पहिली रोपं तुम्ही लावा, चंदा ताई” हे सार पुन्हा होणार नव्हतं. झाडा, वेलीवर बरसणारे थेंब, जल धारा आणि प्रत्येक ठिकाणी येणारा वेगळा आवाज, मोकळ, निरभ्र, ढगांनी भरलेलं, कधी भगवं, गुलाबी, लाल, विविध निळ्या छटांचं आकाश, वाऱ्यावर डोलणारी चमकदार लुसलुशीत कोथींबीर, वेली आड लपलेली दोडकी, पडवळ, छोट्या झाडात लपलेली वांगी, उंच जाणारा रसाळ ऊस, धान्यांनं लगडलेली भात, गहू, खपली, ज्वारीची कणसं, खूप जागा व्यापणारा आणि वाळल्यानंतर खाट निर्माण करणारा तंबाकू, खळभर लाल मिरच्या आणि कित्ती तरी गोष्टी दिसणाऱ नव्हत्या, ना त्यांचे वास येणार होते. शेतात भाताचा सुगंध, घ्राणेंद्रियाला तृप्त करून क्षुधा वाढवणारी हिरवीगार भातशेती, पाडव्याला दिसणारा भारद्वाज पक्षी, वसंतात सगळा मळा आपल्या आवाजाने कुहू कुहूमय करणारी कोकीळ आणि विटू, विटू म्हणून गोड पेरू झाडावरच फस्त करणारी लुच्ची पोपट, मैना जोडी, म्याव म्याव करून पायात रुळणारी मनी, सुंदरी मायलेकी माऊ, फुस्सss करून फुत्कार सोडणारे पिवळा, काळा दहाचा आकडा मिरवणारे नागोबा, “हस्त हा नाक्षत्राचा राजा” म्हणतं रोज एक प्रमाणे पंधरा दिवस माळा चढवून, चढत्या क्रमाने फेर धरून गाणी गाऊन घेणारा आणि खिरापत खाऊ घालणारा हादगा, शेणाच्या बाहुल्या, त्यावर ताजी सुवासिक फ़ुलं माळून घेणारे दिवाळी पांडव, ताजी डहाळी, फ़ुलं लेऊन बसणारी मार्गशीर्ष गुरुवारची लक्ष्मी, सगळं दिसणार नव्हतं जसंच्या तसं.
पण खंत नव्हती असं म्हणून मनकप्प्यात दडवून ठेवल्या आठवणी.
क्षितिज खुणावत होतं वेगळं,
कक्षा रुंदावल्या आकाशाच्या की,
दृष्टी गेली क्षितिजप्रभा न्याहाळत,
भूतकाळाला मागे ठेवत,
अनुभवाचा ठेवा कवटाळत,
भविष्यावर दृष्टी ठेऊन,
कवटाळत सुंदर स्वप्न,
अचूक पाऊले टाकत पुढेपुढे
वर्तमानात मी चालते पुढे पुढे🦶🦶
काहीतरी कमवायला काहीतरी गमवावं लागतं म्हणतात. पण गमावणारी विनिता होती. कमावणाऱ्या होत्या तिच्या तीन मुली. न झालं, न आहे, न पुढे असणार आहे..
मुलींच्या बाबतीत हिशेबी नव्हती ती. सर्वस्व उधळणारी, एकमेवद्वितीया विनिता, नच दुजा कोणी.
पण ते इतक सोपं होतं का?
मळा विकणं??????? इतक सोपं खचितच नव्हतं. आले मदतीला छोटू काका एका अटीवर. “माझ्या दारात येऊन बसायचं नाही ” “माझ्या मुलींची लग्नं लावून द्या म्हटलेलं नाही चालणार”. स्पष्टवक्तेपणा निश्चितच स्वागतार्ह होता. आणि न रक्ताचं नातं, न जोडलेलं, माणुसकी म्हणून हितचिंतक, निरपेक्ष भावाने आले मदतीस.
एक, दोन, आठ, दहा महिने जात होते. ओढाताण प्रयत्न, उपाय. अडथळे नैसर्गिक, अडथळे मानव निर्मित त्यांना भीक घालेल ती विनिता कसली???
आलं अंगावर तर शिंगावर घेणारी, आरे ला कारे करणारी, मनानं खंबीर विनिता.
सगळयांचे वाईट हेतू धुळीस मिळवणारी विजयता, एकमेवद्वितीया विनिता.
दरम्यान इकडे काय चालू होतं… रश्मीची कॉलेज साठीची तयारी कुठं पर्यंत आली होती???
कोणते प्रश्न विचारले, लोचन, सुची नी?
“काकू कोणत्या जमान्यात वावरते तू? रश्मी कॉलेजला साडी घालून जाणार का? एकदम इतक्या साड्या घेतल्या तू? पर्स मस्त आहे लाल रंग, “क्रांती,” सोनेरी अक्षरात लिहिलेल्या चप्पल पण छान.” विनिता काकूंचा उत्साह जबरदस्त. कॉलेज तरुणीला लाजवील असा. नव्या नोटबुक, पेन, बॅग, छत्री जय्यत तयारी सुरु होती. शिक्षण आणि त्या संदर्भात आवश्यक गोष्टी या बाबत नकार, काटकसर तिला नव्हते माहित. काकून रश्मीसाठी चालविलेली कॉलेजची तयारी पाहून आवाक झाल्या. त्यांना आठवलं, दहावीचा शेवटचा पेपर दिला आणि रश्मी परीक्षा हॉल मधून बाहेर आली तर विनिता वाटच पाहत होती तीची. आपली पोर वर्षभर अभ्यास करत होती. आता परीक्षा संपली, “रश्मी, चल आज आपण पिक्चर पाहू!” रश्मीचा चेहरा एकदम खुलला आणि आईनं आणलेल्या डब्यातील पोळी भाजी खाऊन मायलेकी निघाल्या यशवंत सिनेमा थेटरला. कुमार गौरव, विजयेंत पंडितचा, “लव्ह स्टोरी” पाहायला.
आपली आई अफलातून आहे. तिच्या या पिकचर पाहण्याच्या आयडिया मुळं आपण एकदम फ्रेश झालो. आणि घरी सर्वाना सांगितलं तर हेवा वाटला सर्वाना. सर्व आठवून आणि कॉलेजला जाण्यासाठीची तयारी पाहून त्यांच्या तोंडून उदगार निघाले,
“काकू, कोणत्या मातीची बनली आहेस तू?” संजू आणि सूची कौतुकाने काकूला विचारत होत्या.
रश्मि बद्दल प्रश्न????
रश्मीच काय चाललं होतं?
होती का जाणीव? की होती तोऱ्यात? शिक्षण आपला हक्क. आई वेगळं काय करतेय? समजत होती का विनिताचं मनं? धडपड? अडचणीतून काढलेला मार्ग माहित आहे कां?
विश्व मोठं झालं तिचं. मळ्यातून गावात, प्राथमिक, उच्चं प्राथमिक शिक्षण, समृद्ध अनुभव घेऊन बाहेर पडली. केंद्र शाळा, हायकूल पूर्ण कारुन आणि अनुभवात भर टाकून तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जाणार होती ती.
परिस्थितीची जाणीव ठेवणार का? “ग” ची बाधा नाही ना होणार? की तिच्या वागण्या बोलण्यातून तसा संबोध होणार? पण कुणाला असं कां वाटेल? आता ती षोडशा होती. रंग उजळ, चार चौघीत उठून दिसत होती. तालुक्याला वातावरण वेगळं, टिन एज… तना मनात बदल. बदल स्वीकारून भावनिक बदलांना समोर जाण. तरुण शक्तीला (chanalizing teen age energy) योग्य वळण देण, एनर्जी योग्य प्रकारे बाहेर काढून त्याचा उपयोग करण तस पहिल तर कठीण. पण योग्य वेळी, योग्य निर्णय योग्य फळ देतो…..
कॉलेज प्रवेश,
आणि अखेर विनिता गेली कॉलेज मध्ये रश्मीला आकारावीला प्रवेश घेण्यासाठी. तिच्यासारख्याच बऱ्याच मुली दिसत होत्या प्रवेश घेण्यासाठी. आता कॉलेजमध्ये दोन विभाग होते कला आणि वाणिज्य. आली कां पंचाईत. “मी काही कलाकार नाही “
माझी आई आणि बहिणी कलाकार आहेत. मी कॉमर्स घेईन.” इति रश्मी.
संबंधित क्लर्कन हसून 🤣 फॉर्म दिला. तो भरून दिला. फी भरली. झालं ऍडमिशन. गावाच्या शाळेपेक्षा, हायस्कुल पेक्षा मोठी इमारत, खुप सारे वर्ग, प्रशस्त लायब्ररी, स्टाफ रूम, गर्ल्स रूम, वॉशरूम, आणि प्रचण्ड मैदान. कॉलेजपाठीमागे डोंगर होते. पावसाळ्या मुळे डोंगर हिरवे दिसत होते. कॉलेज शिफ्ट सिस्टिम मध्ये चालत होते. बाजूला हायस्कुल होतं. इथं जवळपासच्या गावांमधून, बरीच दूरवरून मुल, मुली प्रवेश घेत होते. एस.टी. स्टॅन्ड पासून कॉलेज जवळ होतं. डिग्री कॉलेज गावाबाहेर होतं. हायकूल मधील काही मुलानी सायन्स फॅकल्टी साठी गावाबाहेरच कॉलेज निवडल. कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर व्हायचं होतं, त्यांना दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागे. कॉलेजच वातावरण पाहून हलक वाटल. रश्मी जास्त बोलत नव्हती. इकडे विनिताच्या डोळ्यात ख़ुशी मावत नव्हती. जणू खुप मोठं काहीतरी गवसल्या सारखं. “चल रश्मी, तुला वडा सांबारची पार्टी देते” इति विनिता
आईला इतकी खूष पाहून रश्मी पण खूष झाली. कॉलेज कॅम्पस मधून बाहेर पडून हजारें काकाच्या दुकानातून पुस्तकं घेतली. “माले sss, मालेsss, मल्लीगे हुवा माले” म्हणून पुट्ट्य आला. विनितान गजरे घेतले. सईला दाल मूठ, आणि चंदाला फरसाण आवडायचा विनितान दोघींसाठी खाऊ घेतला.
बस प्रवास, बस पास, रोज दहा की. मी. प्रवास करून जावे लागत असे.
दोनच दिवसात नशा उतरली कॉलेजची.
सरू ताईचा सल्ला
“अरे रश्मी, अभिनंदन. गावातून कॉलेजला जाणारी तू एकटीच मुलगी .
काय घेतलं आर्ट्स की कॉमर्स?” सरिता धर्मे भेटली रश्मीला बस स्टॅन्डवर. सरुताई, संजू अक्काची मैत्रीण. दहावी नंतर संजू अक्कान बालवाडीचा कोर्स केला. सरु ताईला पोलिओ झाल्याने एक पाय अधू होता. म्हणून दूर महाराष्ट्रात जाऊन पदवी प्राप्त करून आली होती. ती साखर कारखान्या मधील कामगारांच्या मुलांना शिकविण्यासाठी जात असे. “सरू ताई, मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. आज तिसरा दिवस.” रश्मी जरा जड आवाजात बोलली.
“हं, शिकवणी कशी लावणार तू अवघड विषयाची?” सरुताई
“आपल्याला अवघड विषयाला ट्युशन लावायला जमत नाही. कॉलेजला जाण्यासाठी आपण बस प्रवास करतो. तू, कॉमर्स नको आर्टस् घे रश्मी ” सरू ताईनं सांगितलं. आर्टस् म्हणजे काय? कॉमर्स, त्याचे विषय याबद्दल सरुताईंन माहिती दिली रश्मीला. रश्मीने कॉमर्स ऐवजी आर्टस् फॅकल्टी निवडली.
मराठी, हिंदी सोडले तर सर्व विषय इंग्लिश मिडीयम मध्ये शिकविले जायचे. एका वर्गात शंभर मुलं. काही पिरियड कंबाइन घेतले जायचे. हिंदी शिकविताना जहागीरदार सर आणि आम्ही मुलं वेळ विसरून जात होतो.
रश्मी, मॅडमना पाहून गप्प कां झाली?
मराठी भाषा पिरियडला मॅड्म वर्गात आल्या आणि रश्मी डोळे मोठे करुन पाहतच राहिली. मॅडमनी स्वतःचा परिचय करून दिला आणि मुलांना नाव, गाव विचारलं. रश्मी झटका बसल्या सारखी अजून डोळे वासून पाहतच राहिली. “तुझा परिचय नाही करून देणार कां?” मॅडमनी विचारलं बाजूला बसलेली बेबी कोपराने ढोसत होती, उठ म्हणून. “मी रश्मी नाडकर्णी, माझं हायस्कुल चन्न……
… गाव न…… ” सांगितलं रश्मीने. तसा मॅडमचा चेहरा खर्रकन उतरला.
“साक्षात हायस्कुलच्या, मराठी भाषा विषय, डान्स, गाणी शिकविणाऱ्या मॅडम समोर असल्याचा भास झाला की काय आपल्याला” उषा मॅडम सारख्याच, एकदम डिट्टो. उंची सोडली तर काहीच वेगळं नव्हत.
पिरियड संपल्या नंतर रश्मी तडक स्टाफ रूम मध्ये गेली. आशा मॅडमची छोटी बहीण उषा मॅडम हायस्कुल मध्ये रश्मीला शिकवायला होत्या. गावातील शांडिल्य काकूंच्या मुलाबरोबर त्यांचं लग्न झालं होतं. एकदम आनंदात होत्या मॅडम. अचानक बर वाटत नाही म्हणून दवाखान्यात ऍडमिट केलं. पण आम्ही पाहिलं, वाड्यात त्यांच्या आवडत्या साडीत शांतपणे हॉल मध्ये झोपल्या होत्य, आणि आम्ही सर्व मुलं, अश्रुंचे पाट वाहात होतो मॅडमची “चीरनिद्रा” मनाला चटका लावून गेली. उषा पन्नाळे मॅडमची मोठी बहीण, आशा मॅडम होत्या कॉलेज मध्ये मराठी भाषा विषय शिकविण्यासाठी.
इकॉनॉमिकस, पोलिटिकल सायन्स, इंग्लिश, हिस्टरी सर्व लेक्चर्स इंग्रजी मध्ये असत. मोठी डिक्शनरी घेतली. रोज शब्द पाठांतर. बुक्स रिडींग, समजून घेणं, नोट्स काढणं चालू होतं. पण अडचणी विचारायला लाज वाटत असे. बरीच मुलं पटापट सगळे समजून घेत होती. प्रगती होतं होती. रोज नव्या गोष्टी शिकताना मजा येत होती. पुतळी सर्वात आवडती मैत्रीण. कन्नड माध्यमाची. पण रश्मी – पुतळीची दोस्ती जबरदस्त. आमच्या मैत्री आड जातं, गाव, भाषा काहीच आलं नाही.
वैजू प्रमाणेच पुतळी पण प्रांजल, प्रेमळ आणि गोड स्वभावाची होती. आमचे मैत्रीचे बंध एकदम घट्ट झाले. अगदी एकमेकीं सोबत सगळ्या गोष्टी शेअर करत असू. मी तिच्याबरोबर मोडक्या तोडक्या भाषेत कन्नड बोलायचा सातत्याने प्रयत्न करत असे.
विनिताचा चेहरा कां काळवंडला?
त्यांना हिंदी पिक्चर बघायचा असे आणि आम्हाला कन्नड पिक्चर पाहायला आवडायचे. “क्रांतयोगी बसवण, ताईंय मडियेली, संत ज्ञानेश्वर असे काही कन्नड पिक्चर पहिले.
“रश्मी, आज हिंदी, पोलिटिकल सायन्स दोन्ही पिरिअड्स ऑफ आहेत. तीनच्या शो ला जाऊया. याराना लागलाय यशवंतला, चल.” पुतळी, स्मिता आणि नजमा एकदम उत्साहात बोलल्या. “पण, सहाला शो सुटणार. सहा दहा ची एस.टी.सुटली की रात्र होते घरी पोचायला. नको तुम्ही जा. मी नाही येत.” रश्मी
“इल्ला येन अँन्ती, नडी रश्मी” म्हणून सीमान हाताला धरून खेचत कॉलेज बाहेर काढल आणि पुतळी, स्मिता सीमा, रश्मी, नजमा थिएटर मध्ये घुसल्या.
पिक्चर सुटला तेव्हा सहा वीस झाले होते. धावत एस. टी. स्टॅन्ड गाठलं तेव्हा बस निघून गेली होती आणि साडेसात शिवाय बस नव्हती.
कोपऱ्या वर रश्मी गाडीतून उतरली तेव्हा, विनिता एकटीच टॉर्च घेऊन उभी होती. रश्मीला अंधारात चेहरा दिसला नाही आईचा पण, “किती उशीर ग..” या शब्दात कंप आणि काळजी होती. तीन शब्द रश्मीच हृदय चिरत घुमत राहिले कानात आणि मनात रात्रीच्या सुनसान रस्त्यावरील अंधारात. घरी पोहोचल्या दोघी तर छोटया चंदा आणि सई तोंड बारीक करून बसल्या होत्या. “आईsss अक्काsss म्हणून बिलगल्या”. आईच्या डोळ्यात बघायची हिंमत नव्हती रश्मीची. एकावेळी तीन जीवांना काळजीत पाडून आपण मात्र सिनेमा पाहायला गेलो याची खंत वाटली तिला.
‘यापुढे अशी चूक करणार नाही, आई.’ एवढंच बोलली रश्मी.
रश्मी, पुतळी लायब्ररीत कां बसत?
मैत्रिणी पिक्चर, मजा करणं
हे सारं ठीक होतं. पण सहामाही परीक्षेच्या निकालान आमची औकात दाखवली. आता आम्ही अभ्यासाची वेळ वाढवली. बराच वेळ लायब्ररीत बसायला लागलो. प्रॉब्लेम्स वर डिस्कशन करून सोलुशन शोधू लागलो. नव्यानउ टक्के मुलं वार्न्याक्युलर मिडीयम मधून आलेली होती. समस्या एकच. इंग्लिश मधून समजून घेऊन अभ्यास करणं. आणि शेवटी वार्षिक परीक्षा झाली. आणि आम्ही बारावीला प्रवेश घेतला.
2 Responses
उत्कृष्ट भाषा शैली.
धन्यवाद मॅडम 🙏