“तू सदा जवळी रहा…. भाग – १० अर्थात: त्रिस्वप्नावली

   

भाग -1*  एक आईं , बायको, आणि नोकरी करणारी आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  ……. 

    भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आईं  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण….

   भाग-3 * शाळा – कॉलेज ,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….

भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत  कुसुम ताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….

  1. भाग -5 * रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते  निशब्द शांतता आणि प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  

भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचं वैध….. सदृश्य जीवन.  

भाग -7 * अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…

भाग – 8*  आईच मानस दर्शन, रश्मीला राजेशची प्रकर्षाने आठवण..   

भाग – ९* राजेश – एक विचित्र रसायन, देविशाची ट्युशन टीचर , काय होणार रश्मीचं?

भाग १०* काय पाहिलं रश्मीने बंद डोळ्याने ? कोंबडा, रेडकू, मंदिरासमोरील रिकामं तुलसी वृंदावन. राजेश रश्मीला गावी का घेऊन जातो? माथेरानच्या ट्रीप मध्ये राजेश ?

साखळी, मंदिर, आणि कोंबडा !

आज गुरुजीनी सर्व मुलांना मैदानावर खेळायला सोडलं. मुलामुलींनी आपापला घोळका बनवला. 👫💃🏃‍♀️🏃‍♂️🏃🚶‍♀️🚶‍♂️🚶 मुलींनी साखळी खेळायचं ठरवलं. आणि डाव टाकला.
“अदल, बदल, कंची कदल, ईवर बिट्टू इवरु यारु? आणि एक एक करत वंदनाच बोट रश्मीवर स्थिरावलं.
रुक्मि, कांता, लीला, वैजू, शोभा, कला, विद्या, शांता, विमल, वंदना, शमशाद, भागू, बेबीजान, नसीमा आणि इतर मुलींनी हुर्यो आवाज केला. सरकारांचा वाडा, मोठं वडाचं झाडं,🌳 मशीद,🌴 पिंपळ कट्टा, जीनगराचं दुकान, मारुती मंदिरा समोर आणि सगळीकडे विखुरल्या मैत्रिणी.
रश्मी, गावदेवीच्या मंदिराजवळ ⛺ आपले हात डोळ्यावर ठेऊन, उभी होती. “सई रामा सुट्ट्यो” म्हणत डोळ्यावरून दोन्ही हात बाजूला काढले आणि समोरच दृश्य पाहून, तिच्या घशातून केंगा आवाज आला, तो आवाज फक्त तिचं ऐकू शकली…. आणि समोर पाहतच राहिली….

एकाने पाय गच्च पकडून ठेवले. हाताने डोकं घट्ट पकडलं. दुसऱ्या हातात तळपणारा सुरा पाहून त्यांन आवाज करायचा प्रयत्न केला तर डोक्याजवळचा हात मानेकडे सरकला आणि आवाज घशात वीरला. दोघांच्या हातातून धडपड करत सुटायचा प्रयत्न करताना त्याच्या लक्षात आलं की मान पकडलेल्या राकट हातावरील केस ताठ उभे राहिले. घट्ट पक्कड, आणखी घट्ट झाल्यामुळे श्वास घेताना त्रास जाणवत होता. आणि एका क्षणी तळपता धारदार सुरा मानेच्या दिशेने जोरात आला आणि रक्ताची चिळकांडी उडाली… धड एकीकडे धडपडत झोरजोरात उडत होतं आणि माती उडवत होते, दुसरीकडे मुंडक उडून खाली पडत होतं. पुन्हा उडत होतं, खाली पडत होतं. असं बराच वेळ चाललं होतं. शेवटी तोंड उघड ठेऊन मुंडक रक्ताळलेल्या मातीत पडलं आणि शांत झालं. जोरात आलेली किंकाळी😰 ऐकून गुरुजी आणि मुलं शाळेजवळच्या गावदेवीच्या मंदिराकडे धावले. रश्मी भोवळ येऊन पडली होती आणि गाव देवीच्या मंदिरासमोर कोंबड्याचे धड आणि मुंडक रक्ताच्या थरोळ्यात पडलेलं गुरुजींनी पाहिलं. “शाळा चालू असताना असले बळीचे विधी करू नका म्हणून सांगितलं होतं तुम्हाला तरी तुम्ही कोंबडं🐓 🐔कापलत इथं? ” वाटणे गुरुजी जोरात पुजाऱ्यावर ओरडले.

मुलाबरोबर जवळच्या शेतातील भांगलण सोडून मजूर पण मंदिरासमोर जमा झाले.
साळत लिंगायत, बामणाची पोर हायती, त्येंच्याम्होर कोंबड कापाय नग व्हतं.” अक्कू बोलली.
“हौसा, पानी आन” रखमा जोरात वरडली.
“मार हबका पान्याचा, पोरीच्या तोंडावर”. इती आक्कू.
हौसानं झोरात पाणी टाकलं चेहऱ्यावर रश्मीच्या. डोळे उघडले रश्मीने. आपल्या भोंवती कोंडाळं करून शाळेतील मुलं, मुली, अक्कू, हौसा, रखमा आणि गुरुजीना बघून रश्मी चटकन उठून बसली…साखळीचा खेळ तिथंच थांबला.

👣🐔🐔🐔🐔🐔🐔
मारुती मंदिरात 🏕️ प्रत्येक खांबाला टेकून उभ राहून, “उप्पा कुडरी, आ मानिगे होगरी,” हा मिठ मागण्याचा मुलांचा खेळ पण थांबला आणि मुलं वर्गात पोहोचली.

खो खो , तुलसी वृंदावन आणि राजू

सोनल, रुक्मि, लीला, शोभा, भागू, यमुना, शमा, नसीम, वैजू, समा, वंदू आणि सर्व मुली आज चार वाजता खो खो खेळायला बाहेर पडल्या. सोनल सहावीत आणि तिचा भाऊ राजू🤵 तिसरीच्या वर्गात होता. गोरापान रंग आणि काजळ घातल्यासारखे डोळे😊. गोबरे गाल पकडून त्याची गंम्मत करायला, सहावी आणि सातवीतल्या 🤰🧕मुली नेहमी पुढें असतं. सर्वांचा लाडोबा होता राजू. उजालान खो खो मध्ये पहिला राउंड मरताना, राजूचे गाल पकडले. लाल झाला तो. राजू वर्गात बसून अभ्यास करत नव्हता की, मुलांच्या बरोबर खेळायला गेला नाही. तो आपल्या सोनल ताईचा खेळ पहात राहिला. मग कंटाळून पिंपळाच्या कट्ट्यावर बसला. इकडे खेळ रंगात आला. आता 🤵राजू, मारुती मंदिरासमोरील उंच रिकाम्या तुलसी वृंदावनात चढून बसला. सोनल त्याला हाक मारून सांगत होती, “राजू तिथं नको बसू, पिंपळ कट्ट्यावर बस”. खेळाच्या गोंगाटात सोनालचा आवाज राजू पर्यंत पोहोचला नाही. शेवटी उजालान त्याला हाताला धरून वृन्दावनातून खाली खेचण्याचा प्रयत्न करून पण हा पट्ट्या काही ऐकायला तयार होईना. शेवटी “लीला, खो” म्हणून लीलाच्या जागी उजाला बसली, लीला धावून, “भागू, खो” म्हणून लीला भागूच्या जागी बसली. भागूने पूर्ण गोल फेरी मारली आणि


नसीमाला, “खो” देणार एवढ्यात,🌳 पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी, “कडाड कट्ट”, आवाज करत मोडून तुलसी वृंदावनात बसलेल्या राजूच्या डोक्यावर पडली. खेळीमेळीच वातावरण एकदम बदलल. सोनलनं, “राजूsssss” म्हणून जोरात टाहो फोडला. प्रसंगावधान राखून भागीरथींनं राजूला खाली खेचून मांडीवर घेतलं. डोक्याच्या भळभळत्या जखमेवर हात धरला. खोप नव्हती, डोक्याला भगदाड पडल होतं. भागीरथीचा परकर पूर्ण रक्तमय झाला तरी रक्त थांबत नव्हतं. नंतर गुरुजी आले, राजुचे आई, वडील, काका, काकू सर्व आले आणि त्याला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले. जखम इतकी खोल होती की, भयंकर रक्तपात झाला होता. आणि सगळंच संपलं होतं. राजू आम्हा सर्वांनां सोडून कायमचा निघून गेला. राजूची कमी आम्हा सर्वांना जाणवायचीच पण प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी सोनल एकदम अबोल व्हायची आणि फक्त डोळे वाहात राहयचे तिचे.


गाव देवाच्या मंदिरा समोर गोल करून का उभे होते यात्रेकरू ?

गावाशेजारी एक मोठा ओढा वाहत होता. ओढ्या पलीकडे एक मोठी टेकडी होती. टेकडीवर जाण्यासाठी प्रशस्त रस्ता होता. आंबा, पेरू, पिंपळ, वड, चिंच, बांबू अशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं🌳🌴🌲🌵🥀 होती. त्या टेकडीवर गाव देवाचं मंदीर होतं. गाव देव सर्व पंचक्रोशीतल्या रहिवाश्याचं रक्षण करतो, असा दावा गावचे रहिवाशी करत असत. वर्षातून एकदा प्रसादाचं जेवण असे सर्वांना. मोठ्या घंगाळा मध्ये अन्न शिजवत ठेवलं जायचं. जेवण वाढण्यासाठी मोठी भांडी वापरली जायची. आमटी, हुग्गी आणि भाजी आणि आंबील वाढण्यासाठी मोठ्या अल्यूमिनियम आणि पितळेच्या बदल्या वापरल्या जायच्या. मंदिराच्या पटांगणात आणि पटांगणाबाहेर लांबच लांब पंगती बसायच्या. जेवणामध्ये हुग्गी, भात, आमटी, भाजी हे प्रसादाचं जेवण खाऊन आणि आंबील पिऊन पंचक्रोशीतील सर्व लोक गाव देवाचा पिवळा भंडारा घेऊन आपापल्या गावी जात. याच गावात गाव देवाची मे महिन्यात जत्रा भरे आणि आसपासचे व्यापारी लोक छोटीमोठी दुकान थाटत असतं. गावात तीन दिवसांचा उत्सव चाले. पहिल्या व दुसऱ्या दिवशी रश्मीची आई: विनिता, मुलींना घेऊन गाव देवाच्या दर्शनाला जाई. पण तिसऱ्या दिवशी विनिता देवदर्शनाला कधीच जातं नसे. प्लास्टिकची खेळणी, 🦊🦌🐴 मोटर बाईक, 🚲🛵🏍️🚌🚍🚊🚉🚓🚖 टुरिंग, सायकल, केसांच्या वेणीसाठी रंगीबेरंगी रीब्बन, दो बदन, नेल पॉलिश, रंगींत गॉगल🕶️👓, सोन्या सारखे चकाकणारे गळ्यातले हार, लफ्फा, कानातले डूल, मोत्याच्या माळा, काचेच्या – प्लॅस्टिकच्या बांगड्या, पैंजण, चप्पल, फ़ुगे,🔴🎈🎈 स्टील, पितळ आणि अल्यूमिनियमची स्वयंपाकाची भांडी, शेतीची अवजारे⛏️🛠️🔧🔨, खेळाचे साहित्य🦈🐬🐋🐔🦃🦆🐾🐧🐦🦅🐿️🕸️🐞🕷️🐚🥄 🎾🏇🤼👭⛄🐽 आणि लाल भडक ओळीने मांडून ठेवलेल्या🍉🍉🍉 कलिंगडाच्या फोडी, उसाचा रस, चोइन्क करून आवाज करणारा गोटी सोडा, दुकानांना लावलेल्या रंगीत कनाती: सगळीच मजा असे. परीक्षा संपल्याने आईचा अभ्यासाचा तगादा नसे. जत्रेतून रश्मी, चंदा, सईचा पाय निघत नसे. जत्रेत मैत्रिणी भेटल्या की, रश्मी आणि चंदा हट्ट करत. दोघी बराच वेळ अळंम, टळंम करत जत्रेत घुटमळत राहत. त्यांना माहीत होतं, उद्या तिसरा दिवस म्हणजे आई जत्रेत येऊ देणार नाही. जत्रेत अक्कू भेटली भांड्याच्या दुकानाजवळ. आईला पाहून म्हणाली, “जात्रीगे होगी, पात्र तगो बेक री”🥄🍽️🍯🍶. अक्कुने काही भांडी विकत घेतली.

तिसऱ्या दिवशी, म्हणजे रविवारी सकाळी जवळच्या वाडीतून रश्मीची मैत्रीण वैजू घरी आली. गावदेवाच्या दर्शनाला रश्मीला घेऊन जाण्यासाठी आग्रह करू लागली. वैजूची आई बरोबर असल्याने विनिताने नाईलाजाने होकार दिला आणि बाराच्या आत देव दर्शन घेऊन मंदिर परसरातून बाहेर पडायला सांगितलं. विनिताला हो म्हणून वैजूची आई, वैजू आणि रश्मी 👭 निघाले देव दर्शनाला. वैजूने स्वतः बरोबर आणलेला गलाट्याच्या फुलांचा🌼🌼🌼🌼 गजरा रश्मीच्या उजव्या वेणीत माळला. मंदिर परिसरात पोहोचायला आकारा🕚 वाजले होते. लांब रांग होती. मुख्य गाभाऱ्यात प्रवेशाच्या ठिकाणी वर पितळेची मोठी घंटा होती. लहान मुलाचा हात पोहोचत नसल्याने बाबा किंवा आईला, मुलांना उचलून घ्यावे लागे. मंदिरात जाणाऱ्या प्रत्येक मुलाला घंटी वाजवून देवाला, आपण आल्याची वर्दी द्यावी वाटायची की, घंटीचा नाद आणि मंदिरात तयार होणारा प्रतिध्वनी कानाला गोड वाटत होता? हे समजत नव्हते. घंटानादानंतर प्रत्येकजण गावदेवासमोर नतमस्तक होतं असे. घोड्यावर बसलेली गावदेवाची मूर्ती सुंदर दिसत होती. पांढरा समोर बंध बांधलेला बाराबंदी, अंगरखा, पांढर धोतर, डोक्यावर रेशमी गुलाबी फेटा, फेट्यावर तुरा, गळ्यात शुभ्र फुलांची माळ, आणि मूर्ती पाठीमागे नागेलीच्या पानांची आरास, गावदेवाच्या कपाळावर भंडारा लावलेला होता. बाजूला मोठया दोन समया लावलेल्या होत्या. समयामधील ज्योतीच्या प्रकाशात गाभारा आणि गावदेव उजळून निघाले होतें. समोर भंडाऱ्याचं ताट होतं. भक्त मंडळींनी आणलेल्या दूधाचा लोटा बाजूच्या पितळी हांड्यामध्ये पुजारी रिकामा करत होता. बाजूच्या खोलीत लांब लांब पितळी चकचकित खूप सारे नाग लाल कपड्यावर ओळीने मांडून ठेवले होते. पितळेचा एक मुखवटा होता. चेहरा रेखीव, लांब नाक, कपाळावर भंडारा, मधोमध लाल कुंकू उठून दिसें. पितळेच्याच मिशा पीळ देऊन टोकदार केल्या होत्या. घाईघाईत दर्शन झालं. पुजाऱ्यानं वैजू आणि तिच्या आईला कपाळभर भंडारा लावला. रश्मी पुढ भंडाऱ्याचं ताट पकडलं त्यांन. चिमूटभर भंडारा दोन भूवयांच्या मध्ये लावून देवाला आणि पुज्यारी काकांना नमस्कार केला रश्मीने. “आक्का गोळरी, ननग नमस्कार माड ब्याडरी,” म्हणून बिराप्पा पुजारी दोन पावलं मागे सरकला. तिघी गर्दीतून वाट काढत मंदिराच्या पायऱ्या उतरत होत्या पण सर्वजण त्यांना मागे ढकलत होते. मंदिरासमोरच्या पटांगणात गोल करून सर्व गर्दी उभी होती. एका खळ्यापेक्षा मोठी जागा रिकामी ठेऊन गावकरी दाटीवाटीने गोल उभे होते. सर्व पुरुषमंडळींच्या कपाळभर भंडारा आणि डोक्यावर रंगीत पटके आणि पांढऱ्या टोप्या होत्या. सर्व बायकांच्या डोक्यावर पदर होते. उन्हाचा कडाका वाढला होता. भंडाऱ्यामुळं, जमीन पिवळी दिसत होती. काही लोक हवेत भंडारा उधळत होते. दोन माणसं, एका रेडकूला गळ्याला दोरी बांधून रिकाम्या जागी खेचून आणत होते. ते म्हशीचं पिल्लू आपले चारी खूर जामीनावर रोवून त्याला ओढणाऱ्या माणसांना विरोध दर्शवत होत. शेवटी त्या दोन माणसांनी जोर लावून रेडकुला मध्ये आणलं. “सरकार! सरकार!” म्हणून गलका झाला. आणि एक गोरी, उंच, सोनेरी चष्मा लावलेली, धिप्पाड व्यक्ती समोर दिसली. त्यांनी भगवा फेटा बांधला होता. अंगात पिवळसर रेशमी अंगरखा आणि सलवार परिधान केला होता. गोऱ्या मानेवर सोन्याची चेन चकाकत होती. ते गृहस्थ डाव्या हाताने मिशीला पीळ देत होते. डाव्या हाताच्या चारही बोटात आंगाठ्या उनामुळे जास्तच चमकत होत्या. उभे असलेले सर्व गावकरी, पुजारी त्यांना आदबीने नमस्कार करत होते. उजव्या मनगटात सोन्याचं कड तळपत होत. उजव्या हाताच्या घट्ट मुठीत धारदार तलवार तळपत होती. दोन माणसांनी रेडकूच्या दोऱ्या विरुद्ध दिशेने खेचल्या. धीरगंभीर चेहरा करून त्या व्यक्तीने तलवार हवेतून जोरात खाली आणली आणि रेडकाचं शरीर आणि मान वेगळी झाली. रक्ताची चिळकांडी रेशमी अंगरख्यावर उडाली. आणि रश्मी, वैजूच्या आईचा पदर घट्ट पकडून तिथंच बसली आणि डोळे घट्ट मिटले. दोनच मिनिटांत त्या तिघी मंदीर परिसरातून बाहेर पडल्या.

जत्रेतील विविध रंगी वस्तू आणि गर्दी पाहून तिघिंना बरं वाटल. वैजूच्या आईनं दोघींसाठी गळ्यातला लफ्फा घेतला. दोघी एकदम खूश होऊन नाचतच एकमेकींच्या गळ्यात लफ्फा घातला आणि आरशात पाहून खुश झाल्या. एकमेकीचा हात घट्ट पकडून तिघी घरी परतल्या.

राजेश, रश्मीला घेऊन गावी जातो.


विसरायचा प्रयत्न करूनही तीनही घटना वारंवार रश्मीच्या स्वप्नात दिसायच्या आणि अठरा वर असलेल्या ए. सी. बेडरूम मध्ये घामाने चिंब भिजायची. सुरुवातीला राजेशला समजलं नाही. पण त्यांन खोदून खोदून विचारलं तेव्हा रश्मीने लहानपणी पाहिलेल्या घटना आणि वारंवार पडणारी स्वप्नं सांगितली .

राजेश, रश्मी गावी पोहोचले. रश्मी, राजेश दोघांनी गाव देवाचं दर्शन घेतलं. नितांत सुंदर मंदिर परिसर पाहून आणि देव दर्शन घेऊन शाळेजवळच्या देवीच्या मंदिरासमोर आले. शाळेतील मुलं मधल्या सुट्टीत खेळत होती. खूप बरं आणि हलक वाटलं. जवळच्या मारुती मंदिरात गेली तर मित्र-मैत्रिणीचा आवाज जाणवला तिला क्षणभरच. आणि आपोआप पाऊल खांबाकडे वळली आणि रश्मी खांबाला पाट टेकून उभी राहिली. “उप्पा कुड री.” म्हणत तिनं हाताची ओंजळ पुढे केली. पण मीठ देण्यासाठी कोणीच आलं नाही. मंदिराचा व्हरांडा शांत होता. राजेश तिच्याकडे पाहून हसत होता. आपल्याकडील मिठाची ओंजळ रश्मीच्या ओंजळीत रिकामी केली आणि म्हणाला, “उप्पा तगोरी”. त्याच्या या प्रतिक्रियेवर रश्मी लट्टू झाली. “मनकवडा” म्हणून नजर भिडवली राजेशच्या नजरेला.

काळ्या पाषाणातील हनुमान मूर्तीला नमस्कार🙏 केला रश्मींनं. अगदी जसा शाळेत असताना करायची तसा. “भीम रुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना||…………………..,

पातल देवता हंता भव्य सिंदूर ……………………., ……………., ध्वजांगे……, ब्रह्मांडे माईली नेणो…

………………., ……………, सुवर्ण कटी कांसोटी……………., हे धरा पंधरा स्लोके लाभली शोभली बरी …………., ……………,

इति श्री रामदास कृतं मारुती स्तोत्रम् संपूर्णम्”||🙏
म्हणत तिनं प्रदक्षिणा पूर्ण केल्या. मंदिरासमोर तुलसी वृंदावन नव्हत आता.


बालपणी, रश्मीच्या बालमनावर आघात करणाऱ्या तीनही घटना तीनं स्वतः सुप्त मनातील कप्प्यात बंद करून ठेवल्या होत्या.
बऱ्याच वर्षांनंतर सलग तिन्ही स्वप्न पुन्हा पहिली रश्मीन.

पहिलीचा वर्ग, शब्द निष्ठ विनोद

पहिलीच्या वर्गात गुरुजीनी, मुलांना अक्षर वाचन शिकवून शब्द शिकवायला सुरुवात केली होती. मगर, अमर, कमल ई. काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार विरहित शब्द पूर्ण झाले होते. आता गुरुजीनी काना असलेले शब्द शिकविले आणि मुलांना एक एक करून फळ्यावरील शब्द वाचायला सांगीतले. “चल राजू, पट्टी हातात घे आणि एक, एक शब्द वाच. बाकीच्या मुलांनी राजुच्या मागे तो शब्द उच्चारायचा, ” म्हणून गुरुजींनी राजुला पट्टी दिली. त्याच वेळी प्रकाश दुकानदाराची आई पत्र घेऊन आली. तिला पत्रातील मजकूर समजून घ्यायचा होतं. तिला बाजूला बसवून गुरुजी राजुकडे वळले. “तुम्ही शब्द का वाचत नाही म्हणून विचारलं?” मधेच हसणाऱ्या सदूजवळ गुरुजी गेले. सदू उभा राहिला. “काय झालं फिदी फिदी हसायला? मजा येते का बाळाला?” गुरुजींचा हात सदूच्या गालावरून गोल गोल फिरू लागला. गुरुजी माया का करताहेत? हे समजेना सदूला. “शिकायला येतात की मज्जा करायला?” दरम्यान गालावर गोलगोल हात फिरवण्याचा चौथा राउंड पूर्ण झाला होता आणि चपराक बसली. मुलं शिकताना मस्ती केली, अभ्यासात लक्ष्य नसल की गुरुजींना राग यायचा. आरडा ओरड न करता, काटी, पट्टीचा वापर नं करता गुरुजी एकच चपराक द्यायाचे आणि सर्व वर्ग एकदम कंट्रोलमध्ये राहायचा. “तू का थांबलास राजू? तुला पण करू का माया?” गुरुजी राजुकडे वळून बोलले. “नको, गुरुजी, वाचतोय गुरुजी,” म्हणून राजूने वाचन सुरु केले. “गुरुजी, भाकर.” मुलांनी तसाच प्रतिसाद दिला.” गुरुजी, गा…, जीभ चावली आणि पुढच्या शब्दावर पट्टी ठेवली गुरुजी, मा…. “. घाबरून राजू आणि मुलांनी गुरुजींना आपण लक्ष्यपूर्वक वाचतोय हे दाखवण्याच्या नादात प्रत्येक शब्दाअगोदर गुरु ‘जी’ लावाला तर अर्थ वेगळा होतो हे त्या लहान राजुच्या लक्षात आले आणि पुढचे शब्द गुरु जी न लावता स्वातंत्र्यपणे कोरसमध्ये म्हणायला सुरुवात केली. गुरुजी, पत्रातील मजकूर समजावून घेण्यासाठी आलेल्या आजी आणि सर्व मुलं झालेल्या विनोदाने जोर जोरात हसायला लागली. नंतर गुरुजीनी, कोपऱ्यात बसलेल्या आजीबाईकडे वळले आणि तिला पत्र वाचून दाखविले. आजी हसतच बाहेर पडली.

स्वतः का आणि कशी सावरली रश्मी?


रश्मीन देवाला दिवा लावला. मंद प्रकाशात दत्त मूर्तीच्या मुखावर स्मितहास्य दिसलं तिला. अगरबत्ती ओवाळली. आणि आज प्रार्थना म्हणताना अश्रू दत्त मूर्तीवर ओघळले. मिटल्या पापण्या मधून गरम अश्रू वाहत होते. राजेश दिसला तिला आज बंद डोळ्यापुढे.

रश्मीने आपले दुःख, आईला आणि इष्ट देवतेला सांगितलं नव्हतं पण आज ……..
💧💧💧💧💧
प्रार्थना देवा तुला ही;
तू सदा जवळील रहा, मी जिथे जाईन तेथे;
प्रेम दृष्टीने पहा || 🙏
ऑफिस आणि देविशा कडे आपण लक्ष्य दिलं पाहिजे याची जाणीव झाली आणि तीनं स्वतःला सावरल आणि कामाला लागली .

भाग – ११ मध्ये वाचा पुढील गमती जमती शुक्रवार 🙏🌹


4 Responses

  1. अप्रतिम लेख.सर्व भाव लिखाणात आहेत.
    असंच सुंदर लिखाण करा आणि आम्हाला शेअर करा.
    धन्यवाद मॅडम

    1. धन्यवाद मॅडम मनाली . आपल्या शुभेछा मला पुढील लिखाणाच्या गुणवत्तावाढीसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल . 🙏

  2. खूप छान लिहिलंय.
    स्थानिक भाषेचा गोडवा औरच.
    घटना विस्तार मांडणी शब्दातीत.
    लिखाण विस्तारित जाऊदे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles
vithal

English Version of, “VEDHA VEDHA RE PANDHARI”

हातात अवघे विश्व सामावले का❓असा भाबडा विचार मनात आला… आणि याच दरम्यान मित्र/ Radhakrishnan sir यांनी what’s app massage केला. महान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज

Read More

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More