भाग – १. आई, पत्नी, नोकरी सांभाळून देवघरात शांती शोधणारी रश्मी.
भाग – २. बाल मैत्रीण; ज्योतीची भेट, पती राजेशचे प्रताप, आईला वाटणारी काळजी. भाग – ३. बालपण, कॉलेज, संकटाचा सामना आणि त्यातून काढलेली वाट,
भाग – ४. कुसुमताईचं कोड्यात टाकणारं व्यक्तिमत्व, पूर्वीची कुसुमताई, आणि ताईचा सल्ला, लहानपणीच्या सई आणि चंदाच्या आठवणी .
भाग – ५. बालपणीच्या रम्य आठवणी, आघात, आईचा खडतर प्रवास
बालपण – रम्य आठवणी ‼️
शशी, उमा, वनिता, छाया, सुचिता, सोनल आक्का मिळून सर्वांची भातुकली एकत्र गोळा करून, नेहमी सारखा खेळ चालू होता. तर राज, मदन, शशी, मोहन, गणेश दादा विटी- दांडूचा खेळ खेळत होते. विटी – दांडू खेळायला गेलेल्या मुलांना नेहमी ओरडा खायला लागायचा. मग कधी भोवरे खेळले जायचे.
रश्मीला पाहून छायाताई धावत आली आणि तिला घेऊन किचनमध्ये गेली. छाया ताई रश्मीची खूप लाडकी ताई होती. ती अभ्यास करताना पण हट्टाने तिच्याच मांडीवर बसायची. रश्मी, छाया ताईच्या हातून सुटण्याचा निकराने प्रयत्न करत होती पण जसा दूध भात समोर आणला तसा रश्मीचा विरोध कमी झाला. छायाताई; मस्त दूध भात भरवत होती आणि रश्मीच्या अगोदरच भरलेल्या पोटात दूध भाताची भर पडत होती. रश्मीचे लाड करण्यात, तिला खाऊ भरवण्यात छायाताईला खूप मजा वाटायची. संपूर्ण नाडकर्णी वाड्यात सर्व मुले- मुली एकत्र खेळत, एकत्र शाळेत जात, एकत्र अभ्यास करत. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून, रुसवे – फुगवे चालत पण अगदी थोडावेळ.
संध्याकाळी वाड्याच्या बागेत लाल, गुलाबी, पिवळी आणि विविध रंगाची गुलबाक्षी फुलायची. मग साऱ्या मुलींचा मोर्चा फुलझाडांकडे वळायचा. फुले तोडून त्याचा गजरा बनवण्यासाठी चुरस लागायची. छाया, संजू आणि वनिता ताई गुलबाक्षीची फुल त्याच्या देठाच्या हिरव्या मण्याबरोबर तोडायच्या आणि सुंदर गजरा बनवायच्या. कोणाचा गजरा जास्त सुबक झाला❓️ याचा निर्णय विनिता काकू आणि शैला काकू कडून शिक्कामोर्तब करायला तिघी मुली धावायच्या.
चिंचेच्या झाडाखाली संध्याकाळी बसून बऱ्याच वेळेस ताई आजी, विनिता आई आणि सर्व काकू, आत्या, मोठी मुले यांचे सार्वजनिक वाचनाचे कार्यक्रम चालायाचे.
तेव्हा मुलींचा गोंगाट, नको म्हणून विनिता किंवा शैला काकू, वनिता, संजू आणि छाया आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या सर्व बच्चेकंपनीला बाजूला घेऊन उत्तम गजरा निवड करायची. तो गजरा तबाकात ठेऊन संध्याकाळी दिवेलागणीला तुळसी मातेला वाहिला जायचा. एकदा असा गजरा निवडला आणि तेवढ्यात रश्मीचे आबा आले काम उरकून.
“अरेच्या, तुळशीमातेला एक गजरा पूरे. दुसरा गजरा माझ्याकडे दे छाया”. रश्मीचे आबा त्यांची पुतणी छाया कडे पाहत बोलले. प्रश्नार्थक ❓️❓️मुद्रेने छायाने तिच्या आबा काकांच्या हातात गजरा ठेवला. आणि सर्वांच्या समोरच त्यांनी गुलाबी गुलबक्षी फुलाचा सुबक गजरा बायको; विनिताच्या लांब वेणीत माळला.
“अय्या, विनिता काकू किती सुंदर दिसताय तुम्ही ❗️” वनिता, संजू आणि छाया ताई एकदम उच्चारल्या. चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या मंडळींच्या नजरा वळल्या. सर्वच जण हास्य विनोदात सामिल झाले. निखळ आनंद, निर्लेप प्रेम, साधं जीवन होत सर्वांचं.
सकाळी एकाच वेळी सर्व नाडकर्णी कुटुंबातील बायका उठून सडा – रांगोळी करायच्या. वाड्याच्या दरवाज्याला मोठा दगडी कोरीव उंबरठा होता. त्यावर आणि दरवाज्यासमोर मस्त रांगोळी काढून रंग भरले जायचे. हळद कुंकू वाहीलं जायचं. छोट्या मुली त्या रांगोळी वर फुलं ठेवायच्या. सर्व बच्चे कंपनी सकाळी अंघोळ, नाष्टा करून दप्तर घेऊन शाळेला निघाल्या की छोटी रश्मी त्यांची पाठ सोडत नसे. गावात ईयत्ता पाहिली पासून शाळा होती. त्यामुळे तीन, चार, पाच वर्षांची मुले घरीच राहत असत आणि आक्का, ताई, दादा शाळेतून यायची वाट पाहात. खेळत किंवा आईचा पदर धरून स्वयंपाक घर किंवा इतर कामात लुडबुड करत राहायची. गावात बालवाडी हा प्रकार नव्हता.
शिक्षणाची आस, आसचं राहिली ‼️
शिक्षणाबद्दल अतिशय आवड असणाऱ्या रश्मीच्या आईचे, विनिताचे मातृछत्र लहानपणीच हरवले. परिणामी विनिताला सातवी पर्यंत शिक्षण मिळालं. तापट स्वभावाच्या आजोबांनी आपल्या हुशार, एकपाठी मुलीच्या हुशारीची कदर केली नाही. आठाराव्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकवले. एकोणीस जणाच्या गांव प्रमुख, नाडकर्णी यांच्या घरी पाऊल ठेवलं तेव्हा विनिता आपलं भवितव्य जाणून चुकली होती. तरी पण तिच्या एकपाठी स्मरण शक्तीची आणि बुद्धीची चमक दैनंदिन व्यवहार आणि कलात्मक जीवन शैलीतून दिसून येत असे. मोठ्या वहिनीकडून स्वयंपाक घरातील पदार्थ शिकत होती. कधी रांगोळी, गाणं, विणकाम, भरतकाम इत्यादी बरोबर प्रचंड निरीक्षण क्षमता, कुटुंबियांना एकत्र बांधून ठेवणे आणि इतर व्यवहार त्वरीत आत्मसात करताना हुशारी दिसून येत असे. रश्मी, चंदा, सई या आपल्या मुलींना मनाप्रमाणे शिकवू, उत्तम संस्कारी बनवू, त्यांना स्वावलंबी बनवू ही खूणगाठ मनाशी बांधली विनीतान आणि त्यावर अंमलबजावणी पण सुरू झाली. सर्व मुलींवर समान प्रेम करणारी विनिता, रश्मीच्या बाबतीत जरा जास्तच हळवी आणि आग्रही होती. घरातील मोठ्या भावंडांचे पाहून रश्मी लिहायला, वाचायला व पाढे म्हणायला लवकर शिकली. वडील, ताई आजी, मोठी भावंड, काका लोक याच्या लाडाने खट्याळपणा आणि हट्ट पराकोटीला जायचा. मग मात्र विनिताआईची फुंकणी रश्मीच्या पाठीत बसत असे आणि मग झोपेत पाढे पाठांतर सुरू असे. रश्मीच्या सर्वात मोठ्या चुलत बहिणी छाया ताई, रजनी ताई, वनिता ताई खूप लाड करायच्या. जबरदस्तीने दूध- भात आणि खाऊ घालून तिला अजून गोबरी बनविली होती. आईला न सांगता आवडीचा पदार्थ खात असताना भीती मोठ्या डोळ्यातून डोकावायची आणि प्रेमानं छायाताई, रजनीताई गालगुच्चे घ्यायच्या. सर्वांची लाडकी असल्याने सतत नवनवीन वस्तू देऊन कौतुक व्हायचं. अतिशय लाडात आणि कोड कौतुकात वाढत होती. रश्मीच्या अण्णाकाकानी रश्मीसाठी सोनेरी गोंडे लावलेल्या छान चपला आणल्या होत्या. त्या सुंदर चपला घालून रश्मी आंगणात खेळायला निघाली. छाया, वनिता, उमा, रजनी ताईंनी काचेच्या छोट्या बाटल्या एकत्र जमविल्या आणि बंगला बनवायची धडपड चालू होती. त्याच्या प्रयत्नाने सुंदर बंगला तयार होताना दिसत होता. रश्मीने त्यातील दोन बाटल्या घेतल्या आणि पाणी भरून घेतलं.
आघात
“आत्तर दाणी – गुलाब पाणी” म्हणून अंगणात बागडत होती रश्मी. अचानक मोठ्या काकूं आजींच्या घरासमोरून चार लोक आपल्या घराकडे काहीतरी घेऊन जात आहेत असे रश्मीला दिसले. पाठोपाठ हृदय चिरणारा आईचा आवाज ऐकला …..
घरासमोरील चिंच वृक्ष 🌳थरथर करत स्तब्ध झाला. गुलाबी कुत्री 🐕 आकाशाकडे तोंड करून जोरात रडली एकदाच. गाईंनं 🐂 हंबरडा फोडला आणि गप्प झाली. बंड्या बैलानं 🐃 धडपड करून दावणीला बांधलेल्या दोरीला जोरात हिसडा दिला आणि स्थिर झाला. …….
आई का रडतेय❓️ हे रश्मीला समजेना. त्यातच आजी, काकू, ताई आणि दादा लोकांचे आवाज मिसळले. रश्मी आणि सर्व भावंडांचे विनिता आणि सर्वांचे लाड करणारी ताई आजी, आईच्या कपाळावरील कुंकू पुसताना दोघी धाय मोकलून रडत 😭😭होत्या. सर्वांचा आवाज त्यात मिसळला. आणि रश्मी पहात राहिली.
फक्त हुंदके आणि मुसमुस ..
निशब्द, निशब्द , निशब्द ….
नंतर आबानां ठेवलेल्या जागी निरांजन ठेवलं. निळी ज्योत तेवत राहिली. ……
पण वडिलांना उचलताना बाबाची लाडकी चंदा, “आबाsssss”, म्हणून जोरात किंचाळली आणि बेशुद्ध पडली. चार लोक आपल्या आबांना खांद्यावरून का घेऊन जात आहेत❓️ हे समजण्यापलीकडे लहान वयाची होती चंदा. छोटी सई कांही महिन्याच दूध पीतं बाळ होत ते. पित्रुसुख काय असतं❓️ हे माहित नसलेलं निरागस बाळ, जोराच्या आवाजान थोडं दचकलं.
आईचा खडतर न संपणारा प्रवास सुरू….👣
अश्रु कोण पुसणार विनिताचे ? सई बाळाकडे कोण पाहणार ? चांदला कोण समजावणार ? विनिताची वैदेही झाली होती. फक्त विचार आणि विचार. स्मशान वैराग्य, स्मशानात येतं म्हणतात. पण स्मशानात न जाताच विरागी झाली विनिता. शरीर निर्मोही झाले. अस्तित्वात आहे का❓️ही शंका येईल इतपत निर्मोही झाली. मजघारातून विनिता बाहेर पडली नाही. आपल्या लहानग्या चंदाला सांभाळायला हवे पण अश्रु आवरत नव्हते. लहानगी रश्मी आईचे अश्रु पुसून म्हणायची, ‘आई तू रडू नको, मी खूप मोठी होईन’. आपल्या छोट्या हातात आईचे हात घेऊन आश्वासन द्यायची. तशी लहानच होती रश्मी.
जेव्हा माजघरात निरोप गेला, “विनिताला बाहेर बोलवा, न्हावी आलंय”
…. ताई आजीनं कान टवकारले, “कोण आहे तिथं?” तिच्या प्रश्नाला करवतीची धार होती.
बाहेरून पुरुषी आवाज थरथरला, “मी”.
तशी सोज्वळ ताईआजी कडाडली, “सुक्काळीच्या, नवरा मेल्यावर मी स्वतः बोडकी झाली नाही तर एवढी लहान मुलगी कशी होईल बोडकी ? आणि विनिता का नेसेल लाल साडी? कोठे आहे तो रांडीचा न्हावी?”
ताई आजी आवेशात बाहेर धावली. पाहते तर, गावातील बरीचशी स्वतःला प्रतिष्ठित समजणारी मंडळी बसली होती. त्यांच्यात कुजबुज चालू होती. ताई आजीचा आवेश पाहून कांही लोकांनी काढता पाय घेतला. न्हावी केव्हाच वाड्याबाहेर पोहोचला होता. “स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची जखम भळभळ वाहत असताना, ‘हे काय ऐकतोय आपण’?” ताईं आजी स्वतःशीच पुटपुटली.
कशाची चाहूल लागली त्या दुःखी माऊलीला? घर भरलेल असतानासुध्दा, तिला एकाकी वाटलं.
बाहेरच्या लोकांनी केलेली हिमत, त्यांचा घरातील हस्तक्षेप नाडकर्णी कुटुंबाच्या अखंडत्व असण्यावर पडलेला पहिला वार त्वेषानं, शिताफीनं परतवला होता ताई आजीने. दहा – बारा दिवसात घरातील कुजबुज तिला अस्वस्थ करत होती. पण साऱ्या घडामोडीत ताई आजीचे विनिता आईशी असलेले बंध आणखीनचं घट्ट झाले होते. लहानपणीच स्वतःच्या आईला गमावलेल्या रश्मीच्या
आईला, म्हणजेच विनिताला नव्याने आईची संकल्पना उमजली.
चंदाच्या बेशुद्ध पडण्याने मात्र विनिता मनातून चरकलीच होती. सईसाठी विनितान दुःख, आश्रु बाजूला ठेवले आणि उभी राहिली. तिला माहित होते, उभे राहण्यात साथ नव्हती. जोडीदाराचा हात नव्हता. तीन चिमण्यांना घेऊन वाट तुडवायची होती. समोर पूर्ण अंधकार होता. या चिमण्यांच्या पंखात बळ आणणं आता तिचं एकटीच काम होतं. हृदयातील खळबळ आणि मनातील वेदना डोळ्यातून पाझरत होती. …
जीवनाच्या वाटेवर, काटेच काटे आले,
प्रत्येक पावलागणिक, रक्त बंबाळ झाले ||
जीवन प्रवासात या, मी आहे वाट चुकले,
जीवनाच्या साथीस, मी कायमची मुकले ||
व्याकुळता अश्रुद्वारे वाहत होती विनिताची. तिचा राम तिला सोडून गेला होता, सर्व जबाबदारी एकटीवर टाकून.
भूतकाळ आठवताना रश्मीच्या गालावरून अश्रु ओघळत होते. डोळ्यासमोर आई उभी राहिली. लांबच लांब केसांची. ताई आजी तिची वेणी घालायची, कारण खूप लांब केसांमुळे विनिता आईला स्वतःला वेणी घालता येत नव्हती. तिला आठवल आबांनी स्वतः गुलाबाच्या फुलांचा हार जेव्हा तिच्या केसात माळलl तेव्हा आई लाजून चुर झाली होती. रश्मीला या साऱ्या आठवणींमध्ये भावनांचा – कल्लोळ झाला. आपल्या मनाला झालेल्या दुःखाची झळ, पती राजेशने दिलेली भळभळती जखम, प्रतारणा आईच्या आठवणीने बोथट वाटली तिला. आबांबरोबरचा उणा पुरा आठ वर्षाचा संसार होता विनिता आईचा.
तिन्ही मुलींना शिक्षण देऊन, संस्कारी, स्वावलंबी बनवून, लग्न लावून दिली. चंदनाला लाज वाटेल असं झिजली माऊली. सुगंधित केलं मुलींच जीवन अगदी निरपेक्ष भावानं. अज्ञान मुलींची फक्त आणि फक्त पालनदार झाली.
तिला आईच्या विचारानं बरं वाटलं. आपल्यासाठी विनिता आईने खूप कष्ट घेतले. आपण आभ्यास करताना तिचं जागरण चालू आसायचं. वर्षे गेली. प्राथमिक शाळा, दहावी, बारावी, पदवी, त्यानंतरचा कोर्स, सारं आठवलं. आकराविला असताना आईला न सांगता पाहिलेला अमिताभ बच्चनचा याराना पिक्चर आणि उशिरा घरी पोहॊचल्यावर चिंतेने व्याकुळ झालेल्या विनिता आईचा चेहरा, आईला पुन्हा त्रास न देण्याची केलेली प्रतिज्ञा, स्थलांतर, स्थित्यंतर, पुन्हा स्थलांतर आणि त्यातून आलेलं शहाणपण आणि शिक्षणात झालेली प्रगती सारं सारं समोर आलं.
आज जे आपण आहोत त्या पाठीमागे आईचे श्रम, जिद्द याबरोबरच, मोठ्यांचे आशीर्वाद, गुरूंचे मार्गदर्शन, स्वतःची जिद्द आणि श्रम आहेत.
आलेल्या छोट्या – मोठ्या समस्यांवर आपणच उपाय शोधायला पाहिजे. ही मुंबई आहे. नीती अनितीच्या कल्पना वेगळ्या. जीवनमूल्ये वेगळी. रोजच्या समस्या वेगळ्या. अकस्मात समोर आलेल्या अडचणी वेगळ्या. इथं सारचं वेगळं. आपल्यावर भरभरून प्रेम करणारी विनिता आई शेकडो मैल दूर . पाठच्या बहिणी राज्याच्या दुसऱ्या टोकाला. आपल्यामुळे इतरांना आजिबात त्रास होता कामा नये हे बालपणी आईने दिलेले संस्कार.
त्यामुळे आपल्या जोडीदाराचे, “पराक्रम” कोणाकडेच बोलली नव्हती रश्मी. ना जीवाभावाची मैत्रीण जवळ होती. तिच्या मते गुरु, माता, पिता, बंधू, भगिनी, मैत्रिणी सर्व काही तिचे श्री गुरुदेव दत्तात्रेय होते. सारी प्रार्थना श्री दत्त चरणी. सुख , दुःख, आनंद, समाधान, त्रास, क्लेश, आडचणी, श्वास, निःश्वास सारं श्री दत्त पादुकांना आणि विश्वात्मक देवाला अर्पण करत असे. पण ….
तीनं प्रार्थना आळवली….
दुःख जेव्हा दाटूनिया भार होतो अंतरी,
मी कशी विनवू तुला रे धाव तू गरुडापरी ||
संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा,
मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पाहा ||
अश्रूंचा अभिषेक घडला.
हृदयस्थ देवाकडून मंदिरातील देवावर साश्रू नयनांनी केलेला अभिषेक होता तो.🙏
मंद प्रकाश, उदबत्तीचा सुगंध,
ताजी रंगीबेरंगी फुलं. चित्त पुलकित झाले रश्मीचे.
🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺
…. 🙏🙏
अचानक ज्योती भेटते आणि दाबून ठेवलेला उमाळा उचंबळून वर येतो. आणि बालपणीच्या संमिश्र आठवणी ताज्या होतात …पुढे वाचा
भाग – 6 मध्ये ….
6 Responses
Nice madam
धन्यवाद 🙏
Nice
धन्यवाद. आपलं मत भविष्यातील चांगल्या साहित्य निर्मिंतीस प्रेरणादायी ठरेलं.🙏
Excellent 👌👌
आपलें मी लिहिलेले ब्लॉग वाचन आणि त्यावर दिलेले अभप्राय मला प्रेरणा देणारे आहेत धन्यवाद 🙏🌷